ना तिकीटाचं टेन्शन, ना टीसीची कटकट, भारताच्या ‘या’ रेल्वेमधून तुम्ही करू शकता अगदी मोफत प्रवास!

| Updated on: Nov 27, 2024 | 6:15 PM

तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटेल की भारतामध्ये अशीही एक ट्रेन आहे, जी मोफत चालवली जाते, त्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला कुठलंही तिकीट काढण्याची गरज नाहीये.

ना तिकीटाचं टेन्शन, ना टीसीची कटकट, भारताच्या या रेल्वेमधून तुम्ही करू शकता अगदी मोफत प्रवास!
Railway
Follow us on

भारतामध्ये जगातील सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. देशभरात दिवसाकाठी 13 हजारांपेक्षा अधिक रेल्वे धावतात. रेल्वेमधून अंदाजे दररोज 2 कोटी 31 लाख प्रवासी प्रवास करतात. भारतात असलेल्या रेल्वे नेटवर्कची एकूण लांबी 115,000 किलोमीटर आहे. स्वस्त पण दर्जेदार प्रवासासाठी जगभरात भारतीय रेल्वेची ओळख आहे. मात्र तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटेल की भारतामध्ये अशीही एक ट्रेन आहे, जी गेल्या 75 वर्षांपासून मोफत चालवली जाते, त्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला कुठलंही तिकीट काढण्याची गरज नाहीये, किंवा तुम्ही पकडले गेलात तर टीसी तुम्हाला दंड देखील करणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर ट्रेनमधून मोफत प्रवास करायचा असेल तर तुम्ही या ट्रेनमधून करू शकता.

या ट्रेनला भाकरा -नांगल नावानं ओळखलं जातं.ही ट्रेन गेल्या 75 वर्षांपासून प्रवाशांना मोफत सेवा देत आहे. ही ट्रेन पंजाबच्या नांगल पासून ते हिमाचल प्रदेशच्या भाकरापर्यंतचा केवळ 13 किलोमीटरच धावते. या दरम्यान येणाऱ्या पाच स्टेशनवर ही ट्रेन स्टॉप घेते.ही ट्रेन सतलज नदी आणि शिवालिक डोंगर रांगांमधून धावते. हा परिसर खूपच निसर्गरम्य आहे.भाकरा -नांगल प्रकल्प निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री आणि मजुरांच्या वाहतुकीसाठी ही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली होती. या ट्रेनला लावण्यात आलेले सीटं हे साधारण दर्जाचे आहे, मात्र या ट्रेनला एक मोठा इतिहास आहे.

भाकरा-नांगल प्रकल्प जेव्हा तयार होत होता तेव्हा तिथपर्यंत बांधकामासाठी लागणार अवजड साहित्य जसे की खडी, वाळू, सिमेंट विटा पोहोचवण्याचं मोठं आव्हान होतं, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची आवश्यकता होती. तसेच मजुरांना देखील तिथपर्यंत पोहोचण्याचं दुसरं साधन नव्हतं. त्यामुळे ही खास ट्रेन सुरू करण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानंतर डॅम परिसरात असलेल्या गावांना जोडण्यासाठी ही ट्रेन सुरूच राहिली. ही ट्रेन ब्यास प्रबंधन बोर्ड अर्थात (बीबीएमबी) च्या देखरेखीखाली चावण्यात येते. ही ट्रेन चालवण्यासाठी येणार खर्च आणि इंधनाचा विचार करून या ट्रेनमधील प्रवाशांकडून देखील शुल्क आकारण्याचा विचार सुरू होता. मात्र या ट्रेनला असलेली ऐतिहासिक पंरपरा लक्षात घेऊन ही ट्रेन प्रवाशांसाठी मोफत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रेनचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे या ट्रेनच्या कोचची निर्मिती ही कराचीमध्ये झाली आहे, तर या ट्रेनमध्ये असलेली सीट ही इंग्रजांच्या काळातील आहेत.