बेळगावः गेल्या कित्येक वर्षांपासून कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून नेहमीच अन्याय, अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे आता सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यामध्ये बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
त्यामुळे बेळगावसह सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख आणि कन्नडिगांकडून केला जाणारा अन्याय अत्याचाराची माहितीही पंतप्रधानांना सांगणार असल्याचे मत युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यामुळे सीमावादावर 24 नोव्हेंबर रोजी ठिणगी पडली होती.
त्यातून सीमावादावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून जोरादार वादंग माजला होता. दोन्ही राज्यात बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. महाराष्ट्रातील अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांचे आर्थिक नुकसानही करण्यात आले होते.
सीमावादावरून जोरदार वादंग सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्य करुन हे वातावरण आणखी चिघळत ठेवले होते.
त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. या सगळ्याचा वृत्तांत सांगण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीकडून पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.
कन्नडिगांकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय अत्याचार केले जात असल्यामुळेच हे दुःख आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.