नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : भारतीय चलनातील नोटा तर प्रत्येकाच्या खिशात असतात. अनेकांनी 1 रुपयांपासून ते 2,000 रुपयांपर्यंतच्या नोटा वापरलेल्या आहेत. त्यापूर्वीच्या आणेवारीत पण अनेकांनी व्यवहार केले आहेत. पण देशात एक शून्य मूल्य (Zero Rupee Notes)असलेली नोट प्रचलित होती, हे सांगून पण तुम्हाला पटेल का? विशेष म्हणजे या नोटेचे मूल्य ते काय असणार नाही का? खरंच या नोटेचे काहीच मूल्य नव्हते. ही नोट छापून ती लोकांमध्ये वितरीत करण्यात आली होती. पण ही नोट छापण्यामागे कारण तरी काय होते, ती छापण्याची गरज का पडली?
या NGO ने छापली नोट
2007 मध्ये चेन्नई येथील एका एनजीओने हा प्रयोग केला होता. 5 पिलर (5th Pillar) असे एनजीओचे नाव होते. या एनजीओने शून्य मूल्य असलेली नोट छापली होती. या नोटेचा भारतीय रिझर्व्ह बँक अथवा भारतीय अर्थमंत्रालयाशी काहीच संबंध नव्हता. आरबीआयने या नोटेविषयीची हमी घेतलेली नव्हती. अथवा तिला व्यवहारात आणण्याची परवानगी दिली नव्हती. तरीही ही नोट चलनात आली. त्यावर एक खास संदेश देण्यात आला होता. ही नोट हिंदी, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषेत छापण्यात आली होती.
का पडली या नोटेची गरज
देशातील सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार बोकळला होता. अर्थात तो आता कमी झाला असा दावा नाही. तर या भ्रष्टाचारामुळे जनता हैराण झाली होती. कोणत्याही कामासाठी लाच द्यावी लागत होती. टेबलखालून पैसा द्यावा लागत होता. त्याविरोधात 5 पिलर एनजीओने आवाज उठवला. त्यांनी ही शून्य रुपयांची नोट छापली आणि ती रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारांमध्ये वितरीत केली. या अनोख्या पद्धतीने त्यांनी लोकांना भ्रष्टाचाराविरोधात जागरुक केले. त्यांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवला.
लग्न कार्यात पण नोटेची चर्चा
या एनजीओने अनेक लग्नसोहळ्यात ही नोट वाटली. ती अनेक वऱ्हाड्यांच्या हातात होती. याची राज्यभर खूप चर्चा झाली. विद्यार्थी आणि जनतेने त्यानंतर या नोटेचे बॅनर पण तयार केले. या बॅनर आधारे विविध राज्यातील 1,200 शाळा, महाविद्यालयात भ्रष्टाचाराविरोधात कार्यक्रम घेण्यात आले. ही मोहिम पुढे 5 वर्षे चालली. या दरम्यान 5 लाखांहून अधिक लोकांनी भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेत सहभाग घेतला.
कशी होती ही नोट
ही नोट जवळपास 50 रुपयांच्या नोटे प्रमाणे होती. त्यावर दोन्ही बाजूंनी भ्रष्टाचार विरोधातील शपथ लिहिली होती. यामध्ये मी लाच घेणार नाही, लाच देणार नाही, असे लिहिले होते. या एनजीओने एकूण 25 हजार नोट छापल्या होत्या.