एकिकडे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे कोरोना (कोविड-19) विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणत रुग्णांना कोरोनामुक्त करत आहेत. मात्र, दुसरीकडे समाजात कोविड-19 या आजाराबद्दल अशास्त्रीय माहितीचा प्रसारही वेगाने होत असल्याचं समोर येत आहे. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. त्यासाठी इंटरनेटसह इतर सर्व सामाजिक माध्यमे हातभार लावत आहे. त्यामुळे अशास्त्रीय माहिती व अफवांचा महापूर आला आहे. यातूनच काही देशांमध्ये दारु पिल्यानं कोरोना बरा होतो ही अफवा पसरली आणि अनेक नागरिकांचे जीव गेले. त्यामुळेच अशा अफवांवर आणि चुकीच्या माहितीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
अशास्त्रीय माहितीचा प्रसार होऊ नये यासाठी म्हणून तात्काळ पावले उचलणं आवश्यक आहे. मात्र, याबाबत कमालीची उदासीनता पहायला मिळाली. सरकारने वारंवार सूचना देऊनही समाजात पसरलेल्या या चुकीच्या माहितीमुळे, गैरसमाजामुळे नागरिकांकडून आवश्यक खबरदारी न घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे रोगाचा फैलाव होण्यास मदतच होत आहे. यावर उपाय म्हणून आणि सरकार आणि सामाजिक संस्थांच्या जनजागृतीच्या कामाला मदत म्हणून काही तरुण स्वयंसेवकांच्या गटाने कोव्हीड – 19 या साथीच्या रोगाविषयी शास्त्रीय वैज्ञानिक माहिती करुन त्याचा प्रसार करण्याचं काम हाती घेतलं आहे (COVID 19 volunteers stoping misinformation about Corona). युमेत्ता फाउंडेशन नावाचा हा गट ही माहिती समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवत आहेत. या विषयावर व्यापक जनजागृती करत आहे.
हे तरुण जागतिक आरोग्य संघटना (WHO), सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) व आरोग्य व कुटुंब मंत्रालय भारत सरकार (MOHFW) यांच्या निर्देशानुसार कोरोना व्हायरस संबंधी अस्सल आणि वैज्ञानिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा उपयोग ते या रोगाबद्दल माहिती जनसामान्यापर्यंत देण्यासाठी करत आहेत. सुरुवातीला या गटामध्ये डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांनी ही प्रक्रिया सुरु केली आणि त्यानंतर इतर वौविध्यपूर्ण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागाने हा गट समृद्ध झाला आहे. हे काम जेव्हा सुरु झाले तेव्हा याचा उद्देश कोरोना महामारी विषयी जागृती वाढवणे इतकाच मर्यादित होता. पण कालांतराने या संकटाच्या इतर पैलूवर देखील तरुणांनी काम करण्यास सुरुवात केली.
1. सामाजिक माध्यमांचा वापर करुन कोरोना व्हायरस विषयीची शास्त्रीय माहिती विविध भाषांमध्ये लोकांपर्यंत पोहचवणे.
2. ग्रामीण भागात काम करणारे स्वयंसेवी आरोग्य केंद्र, रुग्णालयांना PPE संच उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उभारणे.
3. स्थलांतरित व रोजंदारी मजुरांसाठी सुरु असलेल्या मदत कार्याला सहायत्ता करणे.
4. आरोग्य क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचारी लोकांच्या मानसिक स्वास्थासाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन सुरु करणे.
माहितीचा प्रसार करण्यासाठी, या तरुणांनी विश्वासार्ह स्त्रोतांकडून प्रमाणिकृत केलेली वैज्ञानिक माहिती विविध सोशल मिडियातून पसवण्यासाठी संपर्काची सोपी पद्धती तयार केली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे ध्येय आहे. या प्रक्रियेस प्रारंभ करण्यासाठी फाऊंडेशनच्या वेबसाइटवर एक स्वयंसेवक फॉर्म तयार केला आहे. तो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात आला. याद्वारे जवळजवळ 400 लोकांनी यासाठी नोंदणी केली. या विषयाबद्दल सर्जनशील आणि संवेदनशील असलेल्या लोकांना स्वयंसेवक म्हणून या कामात समाविष्ट करुन घेण्यात आले. या कामासाठी संदेश वाहक म्हणून व्हॉट्सअॅप माध्यमाची निवड करण्यात आली आहे. स्वयंसेवकांना त्यांच्या आवडीच्या कामानुसार – माहिती सामग्री तयार करणे, डिझाईन, भाषांतर आणि प्रसार अशा विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. सामजिक जाणीव असलेल्या स्वयंसेवकांच्या मदतीने शास्त्रीय माहिती स्थानिक भाषेमध्ये (उदा. मराठी, ओडिया, आसामी, तेलगु, तमिळ, मल्याळम, गुजराथी, उर्दू, इत्यादी) सोप्या शब्दात भाषांतर करुन लोकांपर्यंत पोहचली जात आहे.
या कामांतर्गत प्रत्येक दिवशी एक विषय निवडून त्या विषयानुसार पोस्टर/व्हिडीओ बनवले जातात. साध्या, सोप्या व दृश्यात्मक भाषेत ही माहिती मांडण्याचा प्रयत्न केला जातो. वाचकांसाठी सर्व पोस्टर आणि व्हिडीओ युमेत्ताच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहेत. मागील 3 आठवड्यांत आरोग्याशी संबंधित 20 विषयांवर काम करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरस प्रसार, लक्षणे आणि प्रतिबंध अशा आरोग्य विषयक प्रश्नांसंबंधी विषय सामग्री तयार करण्यात आली आहे. हात धुण्याचे तंत्र, स्वच्छता पाळणे, सामाजिक अंतर राखणे, रोग प्रतिकारक्षमता, मानसिक आरोग्य, कोरोना व्हायरस काळात स्तनपान, वृद्धांचे आरोग्य, यासोबतच आमच्या गटाने कोरोना माहामारीशी संलग्न असलेल्या सामाजिक–आर्थिक विषयांनाही हात घातला. यात वाढता जातीय तणाव, लिंगाधारित हिंसाचार, पाळीव जनावरांचे आरोग्य, दारु व तंबाखू व्यसनाधीनता, लहान मुलांसोबतचे उपक्रम, इत्यादी.
इंटरनेटच्या माध्यमातून कोरोना संबंधी पसरणाऱ्या चुकीच्या, अवैज्ञानिक माहितीची सत्य पडताळणी करणे हा या कामाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये या महामारीमुळे स्थलांतरित कामगार आणि तृतीयपंथी समुदायाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर काम करण्याचाही या तरुणांचा मानस आहे.
पर्सनल प्रोटेक्टीव इक्विपमेंटसाठी निधी संकलन
माहिती प्रसारणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणल्यानंतर, संस्थेतर्फे या साथीच्या रोगाच्या इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम सुरु आहे. यात पर्सनल प्रोटेक्टीव इक्विपमेंट (PPE, N-95 मास्क, सर्जिकल ग्लोज, फेस शिल्ड, आयसोलेशन गाऊन) यांची देशातील आरोग्य सुविधा केंद्राकडे प्रचंड कमतरता आहे, असं लक्षात आलं. ग्रामीण भागात काम करणारी स्वयंसेवी आरोग्य केंद्रे, रुग्णालये जी प्रामुख्याने गरीब आणि उपेक्षित समाज वर्गासाठी काम करतात तिथे याची कमतरता अधिक तीव्रपणे जाणवते. म्हणूनच संस्थेने या संस्थांच्या PPE संच संबंधिच्या गरजा सूचीबद्ध केल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी निधी संकलन मोहीम सुरु केली आहे. पीपीईचे उत्पादन आधीच सुरु केलेल्या अस्सल विक्रेत्यांसह ओळखले आणि ऑर्डर दिले आहेत. PPE चे उत्पादन आधीच सुरु केलेल्या विक्रेत्यांना शोधले आणि त्यांच्याकडे पुरवठ्याची मागणी केली. हे खरेदी केलेले PPE संच छत्तीसगड, ओरिसा, राजस्थानमधील ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य केंद्र, रुग्णालयांना देण्यात येत आहे. तसेच इतर ठिकाणी मागणीनुसार देण्यात येणार आहे.
स्थलांतरित कामगारांसाठी दिलासा
या टाळेबंदीचा परिणाम समाजातील विविध घटकांवर वेगवेगळ्या प्रमाणात कमी अधिक तीव्रतेने झाला आहे. गरीब, वंचित, रोजंदारी आणि स्थलांतरीत कामगार यांना याचा सर्वात मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मोठ्या संख्येने मानवतावादी स्वयंसेवी संस्था मदत उपाययोजना करण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नांना एक मंच देण्याचा निर्णय घेऊन या संकटाच्या काळात संपूर्ण भारतभर या विषयावर दिलासा देण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचा डेटाबेस तयार केला आहे. देशभरातील मित्रांशी संपर्क साधत या संबंधी कार्यरत असलेल्या संघटनांची विस्तृत यादी तयार करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्थलांतरित कामगार, अपंग, वयोवृद्ध, रेशन कार्ड धारक नसलेले गरीब आणि तृतीयपंथी समुदायातील उपेक्षित वर्गाला रेशन किट वाटप करणाऱ्या तळागाळातील संस्थांसाठी निधी गोळा केला. यात ‘वोवेल्स ऑफ पीपल्स असोसीएशन’ (पुणे), वर्धिष्णू (जळगाव), इत्यादी संस्थांचा समावेश आहे.
मानसिक आरोग्य हेल्पलाईन
आरोग्य सेवा देणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोविड – 19 संसर्गाबाबत तातडीने द्याव्या लागणाऱ्या प्रतिसादामुळे डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य सेवा कर्मचारी त्रस्त होत आहेत. कामाचे दीर्घ तास, कामाचा वाढलेला ताण, कोविड 19 संसर्गाचा धोका, यामुळे आरोग्य सेवा कर्मचारी यांच्यावर खूप ताण येत आहे. त्यांना या कठीण काळात पाठिंबा देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी मनोचिकित्सक आणि मानसशास्रज्ञ यांची टीम आरोग्य सेवा कर्मचारी यांचे टेलेफोनिक समुपदेशन करण्यासाठी एकत्र आली आहे.
कोविड-19 हा साथीचा आजार फक्त सार्वजनिक आरोग्य विषयाची समस्या नाही तर जात, वर्ग, लिंगभाव आणि धर्म यासोबत हा प्रश्न अधिक तीव्रपणे गुंतलेला आहे. म्हणूनच या संस्थेकडून या समस्यांच्या सर्व बाजू समजून घेऊन त्याला योग्य माहितीपूर्ण प्रतिसाद देण्याचा प्रयत्न आहे. या साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नावर काम करण्यात संस्थेसोबत आलेल्या समर्पित भावनेने एकत्र आलेल्या तरुणांच्या टीमचं मोठं योगदान आहे. या तरुणांच्या टीममधील लोकांची विविधता ही संस्थेच्या कामाची जमेची बाजू आहे. भाषा, राज्य, शैक्षणिक पार्श्वभूमी याबाबतीत वैविध्य असणारी ही टीम आहे. या संकट समयी सर्व स्वयंसेवकांनी एकत्र येऊन हे काम सांभाळलं आहे. कोविड 19 संसर्ग संकटाचा उलगडा अधिक सक्षमपणे होण्यासाठी या कामामध्ये गती आणून आणि हे काम अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी यापुढेही ही तरुणांची टीम तत्पर असणार आहे. त्यांना समाजातील सर्वांच्याच मदतीची गरज आहे. सर्वांनीच आपल्या क्षमतेनुसार या कामात सहभागी होणं म्हणूनच अधिक महत्त्वाचं आहे.
(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)
COVID 19 volunteers stoping misinformation about Corona