अमेरिकेतील मोएब सिटी…द ग्रेट ग्रॅन्ड कॅनियन व्हॅलीजवळ असलेलं हे छोटं शहर. १९७१ साली डिलोन, कोलो इथे जन्मलेली डिनेल बलॅन्जी. मोएब शहराशेजारी असलेल्या ग्रॅन्ड केनियसाठी आपल्या नावाबरोबर आपल्या शहरातचं नाव या पोरीनं जगभरात पोहोचवलं.
डिनेल ही एक ॲथलेट आहे. दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन एक्सट्रिम ॲडव्हानन्चर रेसिंग जिंकलेली, सात वेळा इरोनमन ट्रांएथाॅन फिनिशर ( ही फिनिश करणं कर्मकठीण काम असतं ) तर सहा वेळा अमेरिकन ॲथलेट जिंकलेली ही पोरगी एका मोठ्या संकटाला दुर्दैवानं सामोरी गेली आणि वाचली ती तिच्या टॅझ या लाडक्या कुत्र्यामुळे. (Denil and her dog real American story blog by Prashant Kuber )
डिनेल पुढच्या मॅरेथाॅनसाठी तयारी करत होती. मोएब सिटीजवळच असलेल्या ग्रॅन्ड कॅनियन व्हॅलीमध्ये रनिंगसाठी जाणं डिनेलसाठी नित्याचच झालं होतं.
दिवस होता १३ डिसेंबर २००६…!! डिनेलनं इंटरनेटवरुन आपल्या मैत्रिणीला एक मेसेज केला आणि टॅझ या आपल्या कुत्र्याबरोबर ग्रॅन्ड कॅनियनकडे रनिंनसाठी बाहेर पडली. काही अंतर गाडीतून गेल्यानंतर कॅनियनची व्हॅली सुरु होत असे, टॅझसाठीही हे नेहमीचच होतं.
डिनेलनं गाडीतून उतरताना पाण्याची बाटली आणि चाॅकलेटस् असलेला पाऊच बरोबर घेतला आणि टॅझला गाडीतून उतरवून व्हॅलीकडे कूच केली. वर्दळ नावाचा प्रकार या व्हॅलीला माहित नाही, हजारो किलोमीटर पसरलेल्या व्हॅलीच्या या भागात तर कधीतरी कोणीतरी फिरायला येई. टॅझ डिनेलबरोबर तिच्या मागे धावू लागला.
वळणदार आणि ओबड-धोबड पायवाट, कुठे मोठा खड्डा तर कुठे सपाटी तर कुठे एखाद्या मोठ्या दरी शेजारुन डिनेल धावत होती. डिनेलने वेग धरला होत आणि अचानक नशीबानं फासा फेकला, उंचावरुन पळत असलेल्या डिनेलचा पाय एका चपट्या सरकणाऱ्या तुकड्यावर पडला आणि तो सरकल्यानं डिनेल घसरली. डावीकडेच्या तीव्र उतारावरुन डिनेल वेगात घसरत निघाली ती थेट खोल दरीकडे. टॅझ घसरत जाणाऱ्या आपल्या मालकीणीकडे पाहत राहिला. घसरणीचा डोंगर भाग संपल्यानंतर डिनेल ऐंशी फूट खड्या पहाडावरून दरीत कोसळली.
उभीच्या उभी दोन्ही पायावर डिनेल दरीत कोसळली आणि डिनेलचा खुबा या धक्क्यानं चक्काचूर झाला. सुदैवानं डिनेलच्या डोक्याला कुठेही मार लागला नव्हता. डिनेल शुध्दीत होती. पण काहीतरी घडलंय याचा अंदाज डिनेलला आला, डिनेलनं उठण्याचा प्रयत्न केला पण असह्य वेदनांनी डिनेल किंचाळली आणि पुन्हा पाठीवर आडवी झाली. इकडे टॅझ डिनेलला शोधत दरी उतरुन खाली आला.
अहाय्यपणे पडलेल्या डिनेलच्या चेहऱ्यावर जीभेनं प्रेमानं चाटून टॅझनं तिचं सांत्वन केलं आणि डिनेलच्या शेजारी बसून राहिला. डिनेल सुन्न झाली होती, जगातले अवघड-अवघड ट्रॅक्स पादाक्रांत केलेली डिनेल आज एक इंचही चालू शकत नव्हती. यावेळी दुपारचे चार वाजले होते, या दिवसांत ठिकाणचं हवामानाही विचित्र असतं. दुपारी उन आणि रात्री गोठवणारी थंडी. डिनेल “हेल्प हेल्प” म्हणून पुकारत होती पण त्या सुनसान निष्ठूर दऱ्यांमध्ये तिला ऐकणारं कोण होतं, मुक्या टॅझशिवाय…??
टॅझला काहीतरी घडलंय याची कल्पना आली होती. तो मधून अधून दूर जाई पुन्हा डिनेलच्या जवळ बसे आणि अस्वस्थ होई. दिवस मावळत होता थंडीला सुरुवात झाली होती. डिनेलला पुढचं चित्र दिसत होतं. काही दिवसांपूर्वीच याच भागात दोन पर्यटक हरवले आणि भयानक पावसात सापडून दोघांचा मृत्यू झाला होता.
डिनेलनं न उभं राहताच सरकत सरकत पाच किमी दूर असलेल्या गाडीकडे जायचं ठरवलं. पाठीवर झोपलेली डिनेल पोटावर होण्यासाठी पहुडली आणि वळताना झालेल्या यमयातनांनी तळमळली. काही इंच सरकण्याचा प्रयत्न केला पण मोडलेल्या खुब्यानं दाद दिली नाही. डिनेल आणि डिनेलच्या आशेनं पुन्हा पाठ टेकली. सूर्य मावळला तो त्या भयाण केनियनच्या दऱ्यांमध्ये डिनेल आणि टॅझला एकटं सोडून. स्मशानातली शांतता कर्कश्य वाटावी अशी शांतता डिनेल आणि टॅझ अनुभवत होते.
या भयाण वातावरणात डिनेलला आधार होता तो तिच्याकडे एकटक बघत असलेल्या टॅझचा. इकडे पारा झपाट्यानं उतरत होता, डिनेल थंडीनं कुडकुडू लागली. खाण्यासाठी बरोबर घेतलेली पाण्याची एक बाटली आणि काही चाॅकलेटस् एवढाच आधार होता. टॅझ शून्य नजरेनं डिनेलच्या पोटावर मान ठेवून पाहात राहिला.
कडाक्याची थंडी घेऊन चढणाऱ्या रात्रीनं डिनेलसमोर आणखी एक संकट उभं केलं ते हायपोथर्मीयाचं. भयानक थंडीनं शरीरातलं रक्त गोठायला सुरुवात होते. ॲथलेट असलेल्या डिनेलला या गोष्टी माहित होत्या. काहीही करुन शरीर गरम राहिलं पाहिजे यासाठी मग डिनेलनं कमरेपासूनवर सिटअप्स करायला सुरुवात केली. दात वाजत होते शरीर थरथरत होतं. चुकून झोप लागली तर पुन्हा उठण्याची संधीच नसते इतक्या भयाण थंडीत, थेट कोमाच. दर पाच सेकंदानं एक सिटअप….त्या भीषण रात्री डिनेलमधली अॅथलेट जखमी अवस्थेतही जागी होती.
अख्खी रात्र डिनेल आणि टॅझनं जागून काढली. मोडलेल्या खुब्यातून आतल्या आत रक्तस्त्राव होत असल्याचं डिनेलला लक्षात आलं ते पोटापाशी झालेल्या फुग्यासारख्या आकारामुळे. पुन्हा सूर्य उगवला तो पुढे काय हा प्रश्न बरोबर घेऊन. उन चढू लागलं डिनेलनं पुन्हा पोटावर सरकत जाण्याचा प्रयत्न करते, पण पुन्हा काही फुटांच्या अंतरानंतर हताश झाली. तहानेनं जीव व्याकूळ झालेला असतो, तिथेच असलेल्या एका छोट्या खड्ड्यात रात्रीचं दव साठलेलं असतं डिनेल आणि टॅझ ते पाणी पितात. हा दुसरा दिवस….!!
पुन्हा दिवस चढू लागतो पुन्हा डिनेल मदतीसाठी आवाज देते पण व्यर्थ…!! टॅझ पुन्हा डिनेलच्या हताश अवस्थेकडे पाहत बसून असतो. बरोबरच चाॅकलेटही संपलेलं असतं. आतल्या रक्तस्त्रावामुळे डिनेल आणखी क्षीण होते, त्यातच सेप्टीक किंवा इन्फेक्शन होण्याच्या धोका असतो. हळूहळू सूर्य पश्चिमेला कलू लागतो, टॅझनं मात्र आपल्या मालकीणीकडे पाहत राहण्याची आपली दिशा बदललेली नसते. आणखी एक सूर्य मावळतो.
एका भयाण रात्रीची नवी सुरुवात होते. कालच्यापेक्षा आजची रात्र डिनेलसाठी शारीरिक दृष्ट्या आणखी कसोटीची असते. टॅझ आणि डिनेल गेल्या ३० तासांपासून भुकेलेले असतात. पुन्हा त्याच गोठवणाऱ्या थंडीचाच आवाज ग्रॅन्ड केनियनमच्या विशाल खाच खळग्यांमध्ये घुमायला सुरुवात होते. आता मात्र डिनेल मानसिकरित्या खचत चाललेली असते, आधार असतो तो फक्त टॅझचा. टॅझ अधून-मधून शेजारच्या खड्डातलं पाणी पिणं आणि नैसर्गिक क्रिया याशिवाय डिनेलला सोडत नाही.
कुत्रा जगातला सर्वात इमानदार प्राणी का समजला जातो याचा पुरावाच जणू टॅझ देत होता. पुन्हा रात्र संपते आणि तिसरा दिवस उजाडतो. डिनेल पुन्हा थोडी सरपटत काही अंतर पार करते, मोठ्या मोठ्या ढांगा टाकत धावणारी आपली मालकीण सरपटत जाताना टॅझ पाहत असतो. डिनेल तिच्या घरच्यांच्या आणि मित्रांच्या आठवणीनं रडवेली होते. या भीषण संकटातून आपण कदाचित वाचणार नाही याची खात्री डिनेलला एव्हाना झालेली असते.
इकडे तीन दिवस संपर्क न झाल्याने डिनेलचे मित्र आणि दुसऱ्या शहरात राहणारे आई-वडिल पोलिसांना डिनेल हरवली असल्याची माहिती देतात. पोलीस तपासाला सुरुवात करतात, तिच्या सवयींची माहिती घेतली जाते आणि त्यानुसार ग्रॅन्ड केनियनच्या दिशेने सर्च पार्टी आपलं काम सुरु करण्याचं ठरवलं जातं.
चौथा दिवस उजाडतो आता मात्र डिनेलचा पेशन्स संपतो, दमलेला, भुकेलेला टॅझ मात्र अजूनही डिनेलपासून हललेला नसतो. शेवटी डिनेल टॅझला जवळ बोलावते, डोळ्यातून अश्रू वाहत असतात. टॅझ पुन्हा एकदा डिनेलच्या चेहऱ्यावर प्रेमाने जीभ फिरवतो जणू डिनेलला धीरच देतो.
डिनेल टॅझला मला सोडून जा असं सांगते. कारण तीन दिवस एकाच ठिकाणी पडून कुणीही फिरकलेलं नसतं. “टॅझ प्लीज गो ॲन्ड गेट समवन” “गो प्लीज गो” अश्रू ढाळत, कोसळलेल्या, मनानं खचलेल्या आपल्या मालकीणीचे स्वर टॅझच्याही ह्रदयाचं पाणी करुन गेले असतील…!! डिनेल टॅझला कुरवाळते आणि जायचा आदेश देते.
इकडे पोलीस सर्च पार्टीसह ग्रॅन्ड कॅनियनच्या चक्रव्यूहात शिरतात नियतीनं ‘अभिमन्यू’ ठरविलेल्या डिनेलला शोधायसाठी. ( महाभारतातल्या अभिमन्यूला चक्रव्यूव्हात शिरणं माहिती होतं पण बाहेर पडणं नाही ) इकडे डिनेलच्या आज्ञेवरुन टॅझ आपल्या गाडीच्या दिशेने जायला सुरुवात करतो. सर्च पार्टीला डिनेलची गाडी दिसते आणि तेवढ्यात दुरुन एक कुत्रा पळत येताना दिसू लागतो. सगळेच थबकतात, डिनेल गाड्यांपाशी येतो भुंकायला लागतो जणू सांगत असतो, “माझी मालकीण संकटात आहे लवकर चला”. ( ही घटना खरी घडलेली आहे. )
ते लोक काही क्षण वाट पाहतात. टॅझ पुन्हा भुंकतो, आक्रोश करतो आणि पुन्हा ज्या दिशेने आला होता तिकडे जायला निघतो. सर्च टीममधला एक जण एक विशिष्ठ गाडी जी अशा रस्त्यांसाठी असते ती घेऊन टॅझच्या मागे जायला लागतो. टॅझ ते पाहतो आणि त्या व्यक्तीकडे भूंकत भूंकत जायला लागतो.
चार पाच किलोमीटर पायपीट केल्यावर टॅझ पुन्हा डिनेलपाशी येतो. टॅझची देहबोली मात्र यावेळी बदललेली असते. डिनेल त्याला जवळ घेते आणि तेवढ्यात गाडीचा आवाज डिनेलच्या कानावर पडतो. डिनेलला टॅझनं केलेल्या कामगिरीची कल्पना येते, डिनेल जीवाच्या आकांतानं ओरडते “हेल्प प्लीज हेल्प” टॅझनं आपलं काम पार पाडलेलं असतं.
सर्च टीम येते डिनेलला स्ट्रेचरवर ठेवलं जातं अंगावर ब्लॅन्केट टाकलं जातं, टॅझ शेपटी हलवत डिनेलला चाटत आपण मृत्यूला मात दिल्याची खात्री देत असतो. सर्च टीम डिनेल आणि टॅझला घेऊन जाते. डिनेलला हाॅस्पिटलला नेलं जातं. गंभीर इजा झालेल्या डिनेलचं आॅपरेशन चाललं ते तब्बल सहा तास. डाॅक्टर बाहेर येतात आणि एक दु:खद बातमी सांगतात की डिनेल ठिक आहे पण ती आता कधीही चालू शकणार नाही.
मृ्त्यूला दिलेली मात पायावर बेतते. डिनेल हळूहळू बरी होऊ लागते इकडे टॅझही रोज डिनेलला हाॅस्पिटलला भेटायला जात असतो. चार दिवस एका भयंकर संकटात डिनेलबरोबर राहिलेल्या, डिनेलचे प्राण वाचविलेल्या टॅझचे डिनेलने आभार मानावेत ते कसे…??
या घटनेनंतर टॅझला अमेरिकेतल्या एस.पी.सी.ए. नॅशनल हिरो डाॅग ॲवार्डसह चार वेगवेगळ्या पुरस्कारानं गौरवलं गेलं. कुत्रा जातीच्या नैसर्गिक सद् गुण क्षमतेच्या अत्युच्च सीमेचा तो गौरव होता. डिनेलला हाॅस्पिटलमधून घरी सोडलं जातं आता डिनेलचं आयुष्य व्हिल चेअर पुरतं राहिलेलं असतं. पण डिनेल डिनेल होती आणि आहे. डिनेल पुन्हा स्वत:च्या विल पाॅवरमुळे झालेलं डॅमेज रिकव्हर करते, गमावलेली ताकद एकवटते आणि स्वत:च्या पायावर उभी राहते पुन्हा टॅझबरोबर रनिंगला जाण्यासाठी.
डिनेलनं त्यानंतरही अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, कदाचित त्यातल्या काही हरलीही पण आयुष्यातली सर्वात मोठी रेस डिनेलनं जिंकली होती आणि त्याचा हीरो होता टॅझ…!! आपल्या मालकासाठी सर्वस्वपणाला लावत संकटात बरोबर राहिलेल्या आणि डिनेलचे प्राण वाचविलेल्या टॅझला सलाम….!!
अमेरिकेत घडलेली एक सत्यकथा
( सदरचा लेख इंटरनेटवरील माहिती, न्यूज रिपोर्टस् आणि यूट्यूबवरील टी.व्ही. शो पाहून लिहिलेला आहे. )
(Denil and her dog real American story blog by Prashant Kuber )