मानवी इतिहासात कधीच नव्हता असा विषाणू आला आहे. त्यावर अद्याप औषधचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या विषाणूवर कोणतं औषध परिणामकारक ठरेल यासह कितीतरी गोष्टींचा शोध घेणे बाकी आहे. काही लोक गोमुत्र आणि शेणानं कोरोना बरा होतो असं म्हणतात, तर काही लोक चंदनाने बरा होतो म्हणतात. मात्र याची परिणामकारकता कशी मोजायची हा प्रश्न आहे (Dr Abhay Bang appeal to youngsters amid Corona).
गल्लीपासून दिल्लीपर्यंत या आजाराचा संसर्ग होतो आहे. त्यामुळे हा रोग किती लोकांना होईल याचं संख्याशास्त्र अभ्यासावं लागेल. व्यक्तीचं वैयक्तिक वर्तन यात किती महत्त्वाचं आहे, यात लोकांच्या सवयी कशा बदलायच्या, लोकांना यासाठी कसं प्रेरित करायचं, असे अनेक प्रश्न आहेत.
आज रोग जितका पसरला आहे त्यापेक्षा अधिक त्याची भीती पसरली आहे. त्यामुळे त्याचे काही मानसशास्त्रीय अंगही आहेत. काही लोकांनी या रोगाच्या भीतीने आत्महत्या केल्या आहेत. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पातळीपासून जागतिक स्तरावर नवं नेतृत्व उभं राहतं आहे. यातील काही नेते हा रोगच महत्त्वाचा नाही, असं म्हणत आहेत, तर कुणी या रोगाला शिंगावर घेत आहे. आपल्या डोळ्यासमोर कोरोनाला सरकारी रुग्णालयं आणि खासगी रुग्णालयं कसा प्रतिसाद देत आहेत हे दिसतंय. सरकारी आरोग्यविभाग तळापासून कामाला लागला आहे. यातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्र विरुद्ध खासगी आरोग्य क्षेत्र असा संघर्ष पाहायला मिळतो आहे.
या सर्व काळात मानवी ह्रदय हेलावणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. हे लॉकडाऊन अनपेक्षितपणे सुरु झालं तेव्हा दिल्लीतील अनेक विस्थापित घराकडे पायी निघाले. मध्य प्रदेशच्या मुरेना जिल्ह्यात जाण्यासाठी एक मजूर पायी निघाला आणि 100 किमी चालून तो इतका थकला की त्याला दम लागला, छातीत दुखायला लागलं, यानंतर तो रस्त्याच्या बाजूला पडला आणि त्याने शेवटचा फोन घरच्यांना करुन म्हटला, ‘लेने आ सकते हो ते आ जाओ’.
कोरोना रोग सहस्त्र रुपाने आपल्या भोवती प्रगट होतो आहे. असं असलं तरी आपल्या समोर ही ज्ञानगंगा देखील वाहते आहे. याला आपण ज्ञानाच्या अंगाने किंवा सेवेच्या अंगानेही स्पर्श करु शकतो. आपल्या समोर हे सर्व घडत आहे, तर आपला प्रतिसाद याला कसा राहिल? गंगा तर आपल्यासमोर वाहते आहे, आता मी यात उडी घेणार की नाही? असा प्रश्न आहे.
माझ्या जीवनात मी मेडिकलचा विद्यार्थी असताना असाच एक मोठा पडझडीचा काळ आला होता. मी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात असताना 1 महिन्यावर परीक्षा आली होती. वर्ष 1971. अचानक बांग्लादेशमध्ये म्हणजे त्यावेळचा पूर्व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झालं. त्यावेळी 1 कोटी बांगलादेशी भारतात आले. त्यामुळे आरोग्य सेवेची प्रचंड गरज निर्माण झाली. त्याचवेळी माझी परीक्षा होती. त्यावेळी मला काय करु असा प्रश्न पडला. मी विचार केला परीक्षा दर 6 महिन्याला येऊ शकते. माणसाच्या मोठ्या पडझडीच्या काळात जेव्हा 1 कोटी लोकांना आरोग्यसेवेची गरज आहे अशावेळी मी माझा खारीचा वाटा उचलला पाहिजे. शेवटी मी डॉक्टर कशासाठी बनतो आहे? ज्यासाठी मी डॉक्टर बनतो आहे त्याची प्रत्यक्षात गरज असताना परीक्षेचा अभ्यास करु की ते आव्हान घेऊ? अखेर मी बांगलादेशच्या सीमेवर जाऊन त्या बांगलादेशी नागरिकांसाठी आरोग्यसेवेचं काम केलं.
मी इंटर्नशीप करत असतानाही असाच प्रसंग आला. महाराष्ट्रात 1972 चा भयानक दुष्काळ पडला. मराठवाड्यात ग्रामीण भागात आरोग्यसेवेची प्रचंड गरज. दुष्काळी लाखो माणसांवर दुष्परिणाम झालेला. मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशीप करु की तिकडे मराठवाड्यात जाऊ असा प्रश्न त्यावेळी उभा राहिला. त्यावेळी बीड जिल्ह्यात काम केलं. यात मला काय मिळालं असा प्रश्न विचारला तर माझं कर्तव्य पूर्ण केल्याचं मला समाधान मिळालं, असं उत्तर मिळतं. मी डॉक्टर आहे, मी माझा स्वधर्म पूर्ण केला. या आव्हानांमधून माझं शिक्षण देखील झालं आणि अभय बंग त्यातूनच घडला. या आव्हानांना आपण कसा प्रतिसाद देतो यातून आपण घडत असतो. त्यामुळे आजची आपल्या आजूबाजूची कोरोना संसर्गाची स्थिती आणि त्यातील आव्हान देखील आपल्यासमोर हेच सारं घेऊन आलं आहे.
“या विराट आव्हानाच्या वेळी मी काय करु शकतो?”
तुमच्यासमोर एक विराट आव्हान उभं आहे आणि एक इतिहास घडतो आहे. अशावेळी तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही वैद्यकीय विद्यार्थी आहात, तरुण डॉक्टर आहात. अशावेळी आपण स्वतःला विचारावं की मी काय करावं? मी काय करु शकतो, माझा स्वधर्म काय आहे? मी विविध पद्धतीने याला प्रतिसाद देऊ शकतो. मी एक वैद्यकीय संशोधक म्हणून याचा अभ्यास करु शकतो. या विषाणूचं शास्त्रीय ज्ञान शोधून त्याचा संसर्ग कसा होतो याची माहिती काढू शकतो. यासाठी WHO, CDC, Johns Hopkins, Lancet, The New England Journal of Medicine आणि Economist ची वेबसाईट आहे. या काही वेबसाईट मी पाहतो. हे वैद्यकीय शास्त्र आपल्या डोळ्यासमोर आकार घेतं आहे. त्याचा अंतिम शब्द अजून लिहिला गेलेला नाही. वैज्ञानिक अभ्यास करतात आणि ते 7 दिवसात प्रकाशित होत आहे. ते आपण तात्काळ वाचू शकतो. म्हणजे आपण अभ्यासक्रमीय पुस्तकांच्या कितीतरी पुढं राहू शकतो. हा भाग अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये यायला 2 वर्षे लागतील. या डोळ्यासमोर घडणाऱ्या ज्ञानाचा आपण अभ्यास करु शकतो.
आपलं घर, कुटुंब ही आपली एक छोटी प्रयोगशाळा आहे. आपल्या कुटुंबात कितीवेळा आपला एकमेकांशी संपर्क येतो, कितीवेळा आपण हात धुतो, खोकला आला तर आपण काय करतो, हे निरिक्षणही करता येईल आणि आपल्याच कुटुंबातील वर्तन कसं बदलवता येईल, कुटुंबातील लोकांना सुरक्षित कसं करता येईल याचा विचार करता येईल. मात्र, ही झाली प्रयोगशाळा, आपल्याला थोडं प्रयोगशाळेच्या बाहेरही जावं लागेल.
कोठे आणि काय काम करायचं?
मी जिथं राहतो त्या समाजात काय घडतंय, ते अपार्टमेंट असेल, कॉम्प्लेक्स असेल, गल्ली-मोहल्ला किंवा होस्टेल असेल त्या ठिकाणी 200-500 लोक राहत असतील. तेथे मी वैद्यकीय विद्यार्थी म्हणून काय करु शकतो? किती लोकांना ताप, खोकल्याची साथ सुरु होते, किती लोकांना गंभीर रोग होतात, याची मोजमाप करणारी व्यवस्था मी करु शकतो. लोकांचं आरोग्य शिक्षण करु शकतो, त्यांची भीती कमी करु शकतो, लोकांचं वर्तन बदलवण्यासाठी प्रयत्न करु शकतो. ज्यांना साधा ताप-खोकला आहे त्यांना पॅरॅसिटेमॉल देऊ शकतो, धीर देऊ शकतो. काहींना मी विलगीकरणासाठी सांगू शकेल, ज्यांना श्वासाचा त्रास होतो आहे त्यांनी रुग्णालयात जाण्यास सांगू शकतो.
मी जर रुग्णालयातच इंटर्न, रेसिडन्ट किंवा वैद्यकीय विद्यार्थी म्हणून काम करत असेल, तर मी तेथे स्वतःचा वेळ देऊ शकतो. कोरोनाच्या संसर्गाच्या लाटेत अनेक लोकांना गंभीर स्वरुपाचा न्युमोनिया आणि इतर गंभीर रोग होतील. अमेरिकेसारख्या विकसित देशात देखील रुग्णालयं कमी पडली, त्यांनी चौकात टेन्ट उभारुन तेथे वैद्यकीय उपचार देण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेत ही स्थिती असेल तर भारतात काय स्थिती होईल? जिथं वैद्यकीय सेवा आधीच खूप कमी आहेत. अशावेळी ज्यांना थोडंबहुत का होईना वैद्यकीय ज्ञान आहे अशा अनेक लोकांनी गरज लागेल. अशावेळी मेडिकल विद्यार्थी, तरुण डॉक्टर्स, नर्सेस, इंटर्न, रेसिडन्ट हे सगळे त्यांचा वेळ स्वयंसेवेने देऊ शकतो. आपण वैद्यकीय सुरक्षक बनू शकतो. ही जी साथ पसरते आहे आणि आणखी पसरणार आहे याच्यावर नियंत्रण कसं आणायचं यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तपासण्या, देखरेख आणि विलगीकरण अशा पद्धतीने काम सुरु आहे.
जेव्हा स्थानिक साथरोग तयार होतात तेव्हा त्यांना कसं रोखता येईल? मी गडचिरोलीच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखांशी बोललो. ते म्हणाले आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची गरज आहे. आम्ही जे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर आशा आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम करतो आहे त्यांना मेडिकल सुपरव्हिजनची आणि मदतीची गरज आहे. तुम्ही आपल्या डीएचओसोबत काम करु शकता. सर्चसारख्या स्वयंसेवी संस्था ज्यांचं रुग्णालयं देखील आहे आणि 1 लाख लोकसंख्या असलेल्या 150 गावांमध्ये काम आहे अशा ठिकाणी तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करु शकता.
या कामासाठी किती वेळ द्यायचा?
सर्चमध्ये देखील आपण कोरोना नियंत्रणासाठी कार्यक्रम सुरु करतो आहोत. हे काम करायला 1 आठवडा, 1 महिना, 3 महिने अशी काहीही कालमर्यादा असू शकते. ही साथ किमान 3 महिने चालणार आहे. त्याची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा काही काळ असा एकूण 12 महिने तरी हा रोग राहणार आहे. तुमची तयारी, तुमच्या जीवनातील टप्पा पाहून तुम्ही किती वेळ द्यायचा हे ठरवू शकता.
या कामातील धोके कोणते?
यात काही धोकेही आहेत हे समजून घ्यायला हवेत. पहिला भाग तुमच्या आयुष्याचा त्यात वेळ जाणार आहे. या वेळेचा तुम्ही कितीतरी चांगला उपयोग करु शकता असा उपदेश देणारे तुम्हाला हजार लोक मिळतील. म्हातारे कोतारे तर नक्कीच सांगतील की चला आपल्या परीक्षेची तयारी करा, आ्रपल्या करिअरचा विचार करा. त्यामुळे उपदेश आणि उपहास करणारे बरेच मिळतील, निरुत्साही करणारे खूप भेटतील, अशावेळी तुमचा उत्साह त्यांना पुरुन उरला पाहिजे. जीवनाची परीक्षा देण्याची ही वेळ आहे त्यामुळे त्याच आधारवर तुम्ही निर्णय घ्यायला हवा.
“तुम्ही काम करायला गेलात, तर हार तुरे मिळतील असं समजू नका”
तुम्ही गाव, मोहल्ल्यात काम करायला गेलात, तर हार तुरे मिळतील असं समजू नका. लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, तुमचा उपहास करतील. तुमच्याशी असहकार करतील, लोक ऐकणार नाही, अगदी लोक शिव्या देखील देतील. ही सगळी तयारी पाहिजे. हा या कामाचाच भाग असेल. वैद्यकीय धोकेही आहेत. जो स्वयंसेवक म्हणून काम करेल त्याला काही प्रमाणात संसर्गाचा धोका नक्कीच आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सामान्य लोकांपेक्षा संसर्गाचा अधिक धोका आहे. तो धोका पत्करायचा की नाही? युद्धावर जाणाऱ्या सैनिकानं जखमी होण्याचा धोका पत्करायचा की नाही? की युद्धवरील सैनिकाने अगदी आघाडीवर जाऊन अचानक मी धोका घेऊ शकत नाही मी परत जातो असं म्हणायचं? आपण युद्धवरचे सैनिक आहोत. यावेळी तर आपल्याला युद्धात उतरलं पाहिजे. सुदैवाने तुम्ही तरुण आहात. तुरुणांना रुग्णांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग झाला तरी मृत्यूचा धोका अतिशय कमी आहे. बहुतेक मृत्यू 60 वर्षे वयाच्या पुढे आहेत. त्यामुळे धोका तुम्हाला फार कमी आहे, पण तरी धोका आहेच. त्यामुळे धोका घेत काळजीही घ्या. यातच जीवनाची मजा आहे.
या कामातून मला काय मिळेल?
मला यातून काय मिळेल या प्रश्नावर मी म्हणेल आयुष्यात एकदाच येणारी ही संधी आहे. पुन्हा तु्म्हाला ही कामाची संधी मिळणार नाही. आज काम केलं तर याचा अनुभव मिळेल. या कामातून आणि शोधातून तुम्हाला ज्ञान मिळेल. सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला मी माझं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान मिळेल. याचसाठी तर मी डॉक्टर होतोय. फक्त तिजोरी भरुन ठेवायला किंवा फक्त फिक्स डिपॉझिटमध्ये टाकायला मी डॉक्टर होत नाहीए. फ्रिजमध्ये टाकायला मी काही फ्रोजन डॉक्टर होत नाही. आज हे युद्ध उभं राहिलं आहे, आज ही संधी आहे, याला वैद्यकीय सैनिक म्हणून मी प्रतिसाद दिला याचं समाधान मिळेल. तुम्ही घडाल. तुमचं व्यक्तित्व घडेल. तुमचं कर्तुत्व घडेल. तुमची लिडरशीप घडेल. तुमचं चारित्र्य घडेल. तुम्ही यातून घडाल आणि 30-40 वर्षांनी जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा म्हणाल की हो तेव्हा मी हे आव्हान घेतलं म्हणून मी घडलो.
“तीर पर कैसे रुकु मै, आज लहरो में निमंत्रण”
खूप वर्षांपूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या तोंडून एक अतिशय सुंदर कवितेची ओळ मी ऐकली. बिहारमध्ये समाजात बदल करण्यासाठी युवांचं खूप मोठं आंदोलन सुरु झालं होतं. लाखो युवक त्यात भाग घेत होते. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेची एक ओळ म्हटली. ते म्हणाले, “तीर पर कैसे रुकु मै, आज लहरो में निमंत्रण”. या लाटा मला बोलावत आहेत, निमंत्रण देत आहेत की झोकून दे, उडी घे. अशावेळी मी किनाऱ्यावर कसा बसून राहू?
तुमच्याकडे तर एक वैद्यकीय शिक्षणाची नौका आहे. ती तुम्हाला संरक्षणही देते, सेवा करण्याचं साधनही देते. ती घेऊन म्हणा, “तीर पर कैसे रुकु मै, आज लहरो में निमंत्रण”.
(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)
संबंधित व्हिडीओ: