महात्मा गांधींना आजही विचारलं जातं, भगतसिंगांना तुम्ही का वाचवू शकला नाही? …आणि त्याची ‘ही’ आहेत कारणं

| Updated on: Mar 23, 2022 | 7:13 AM

महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी एक महिना अगोदर गांधी व्हाईसरॉयला भेटायला गेले होते. यावेळी त्यांची शिक्षा ही पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 18 फेब्रुवारी 1931 रोजी गांधी स्पष्टपणे म्हणाले की, 'मी त्यांच्याशी भगतसिंगांबद्दल बोललो आहे की...

महात्मा गांधींना आजही विचारलं जातं, भगतसिंगांना तुम्ही का वाचवू शकला नाही? ...आणि त्याची ही आहेत कारणं
Bhagat singh and Mahatma Gandhi
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः सध्या प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया आहे मग कधी तरी भगतसिंग (Bhagat Singh) यांच्या नावाच्या चर्चेला उधाण येतं आणि हे प्रकरण पुढे पुढे जाऊन भगतसिंगाच्या फाशीनंतर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या नावावर येऊन थांबतं. चर्चेला उधान येते आणि 23 वर्षाच्या भगतसिंगाच्या हौतात्म्य आठवून त्या काळी वृद्ध असलेल्या महात्मा गांधीला प्रश्न विचारला जातो की, भगतसिंगाला तुम्ही का वाचवू शकला नाही.

भगतसिंग यांच्या बनवलेला चित्रपट असो की, सोशल मीडिया अस्तित्वात आल्यापासून असो ज्या काळातील युवावर्ग तात्काळ प्रतिक्रिया देतो या सगळ्या कालखंडात महात्मा गांधी नावाच्या माणसाला नकारात्मक भूमिकेत उभा केलं गेलं आहे. ही नकारात्मकता इतक्या टोकाला जात असते की, भगतसिंगांच्या शौर्याविरुद्ध जेव्हा त्यांच्या हौतात्म्यातील खलनायक उभा करायचा असतो तेव्हा ब्रिटीश राजवटीला खलनायक न मानता त्यांचा खरा खलनायक हा महात्मा नावाचा गांधी माणूस असतो.

अंत्यसंस्काराची ती राख होती…

भगतसिंगांना फाशी देण्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळी महात्मा गांधी कराची (सध्याचे पाकिस्तान) जवळील मालीर स्टेशनवर पोहचले. तेव्हा लाल रंगाचे कपडे घातलेल्या भारत सभेच्या त्या तरुणांनी महात्मा गांधींना काळ्या कपड्यापासून तयार केलेली काळी फुले दिली. काळे झेंडे दाखवले. त्या प्रसंगाचे वर्णन खुद्द महात्मा गांधींनीच केले आहे. ते म्हणतात, मला दिलेली ती काळ्या कपड्यांची फुले ही तीन युवकांनी पत्करलेल्या हौतात्म्यनंतरच्या अंत्यसंस्काराची ती राख होती. या घटनेबाबत मी बदल घडवून आणू शकलो नाही आणि त्यामुळेच तरुणांनी माझ्यावर राग व्यक्त केला. त्याही पुढे जाऊन ते सांगतात की, तरुणांनी ठरवले असते तर ते माझ्यावर फुलांचा वर्षावही करु शकले असते किंवा तिच फुले त्यांनी फेकूनही मला मारली असती. पण यातील एकही गोष्ट या तरुणांनी केली नाही. त्यांनी शांतपणे माझ्या हातात ती फुले दिली. त्यांनी यावेळी घोषणाही दिल्या की, गांधीवाद नष्ट होऊ देत आणि गांधी गो बॅक. या घोषणा आणि ती काळी फुले हीच त्यांच्या रागाची खरी प्रतिकं होती असं गांधी लिहून ठेवतात.

धैर्यापुढे मी नेहमीच नतमस्तक

त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गांधी म्हणतात की, भगतसिंगांच्या त्याग आणि धैर्यापुढे मी नेहमीच नतमस्तक असेन, पण माझ्या तरुण मित्रांनो, कुणालाही न दुखावता, आणि दुखावण्याचाही किंचितसा विचारही न करता नम्र, सुसंस्कृत आणि अहिंसक धैर्य मला हवे आहे.

…अशी शंका घेण्याचे कारणच नाही

करामधील 26 मार्च 1931 रोजी झालेल्या कराची अधिवेशनात महात्मा गांधी भगतसिंगांविषयी बोलताना म्हणतात की, तुम्हाला माहितीच आहे की, खुनी, चोर, दरोडेखोराला शिक्षा देणे हे माझ्या धर्माविरुद्ध आहे. त्यामुळे मला भगतसिंगांना वाचवायचे नव्हते, अशी शंका घेण्याचे कारणच नाही. महात्मा गांधींनी कराचीमध्ये ज्यावेळी भाषण केले त्यावेळी बहुसंख्येने नौजवान भारत सभेचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाईसरॉयला एक खरमरित पत्र

नौजवान भारत सभेच्या युवकांनी ज्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर राग व्यक्त केला त्यानंतर झालेल्या सभेत गांधी म्हणतात की, भगतसिंग आणि त्याचे साथीदारांना वाचवण्यासाठी मी काय केले ते मी इथे तपशीलावर सांगितले नाही कारण मी इथे स्वतःचा बचाव करण्यासाठी आलो नाही. त्या काळी असलेल्या व्हाईसरॉयला माझ्या परीने जे सांगायचे होते ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. व्हाईसरॉयला ज्या पद्धतीने समजावून सांगण्याची ज्या पद्धत होत्या त्या सर्व पद्धती मी त्याच्यासाठी वापरल्या होत्या. त्यावेळी 23 मार्च रोजी सकाळी व्हाईसरॉयला एक खरमरित पत्रही लिहिले, आणि त्याच दिवशी भगतसिंग यांच्या कुटुंबातील सदस्यांची शेवटची भेट झाली होती. त्या पत्रात माझ्या ज्या भावना होत्या त्या मी लिहिल्या होत्या.

दयाही कधीच वाया जाणार नाही

महात्मा गांधींनी जेव्हा व्हाईसरॉयला एक अनौपचारिक पत्र लिहिले, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की, लोकांचे मत योग्य असो की अयोग्य असो त्या नंतर होणाऱ्या शिक्षेत सवलत ही हवीच. कोणतेही तत्व धोक्यात नसताना, आणि जनमताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. गांधी लिहितात की, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यानंतर ते पाऊल मागे घेता येत नसेल तर तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की, शिक्षा रद्द करता येणार नाही, पण विचार करुन ती पुढे ढकलण्यात यावी. तुम्ही दाखवलेली दयाही कधीच वाया जाणार नाही.’

गांधींनी सर्वतोपरी प्रयत्न

महात्मा गांधींनी ज्यावेळी कराचीत सभा घेतली त्या सभेत भगतसिंगांच्या बालपणीचा मित्र जयदेव गुप्ता होता, त्यावेळी त्यांनी लिहून ठेवले आहे की, गांधींच्या त्या भेटीचे वातावरण संमिश्र होते. यावेळी उपस्थित असलेले लोक दोन गटात विभागले गेले, एक गट गांधींच्या बाजूने उभा राहिला तर एक गट त्यांच्या विरोधात. महात्मा गांधी फर्डे वक्ते होते. त्यावेळच्या त्यांनी केलेल्या भाषणातूनच ते समजतात. आणि त्यांच्या तर्कशुद्ध, शांत आणि मृदू शैलीने भगतसिंगांना वाचवण्यासाठी गांधींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते हे स्पष्ट होतं.

मला औदार्याची अपेक्षा होती

जयदेव गुप्ता यांनी गांधींची ती आठवण लिहून ठेवली असली तरी काही जणांना वाटतं की, गांधी-आयर्विन करार झाला त्यावेळी त्या करारामध्ये भगतसिंगांची सुटका ही अट घालता आली असती. असा सवालही गांधींना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना महात्मा गांधीच म्हणाले की, ‘तुम्ही म्हणता की मी आणखी एक गोष्ट करायला हवी होती- शिक्षा कमी करण्याची अट करारात ठेवायला हवी होती. मात्र तसे ते झाले नसते. आणि आपण करार मागे घेण्याची धमकी दिली असती तर त्याला विश्वासघात म्हटले गेले असते. झालेल्या शिक्षेत कपात करण्याची अट ही समझोत्याची अट असू शकत नाही, माझ्यासोबत कार्यकारिणी असतानाही ही परिस्थिती मी बदलू शकलो नाही. भगतसिंगांच्या बाबतीत ब्रिटीशांकडून मला औदार्याची अपेक्षा होती आणि मला ती मान्य होणार नाही हेसुद्धा मला माहिती होती, पण तरीही हा करार कधी मोडता आला नसता.

त्या कैद्यांना फाशी दिली जाऊ नये

या घटनेच्या आधी दोन महिने म्हणजेच 31 जानेवारी 1931 रोजी महात्मा गांधींनी अलाहाबादमध्ये स्पष्ट केले होते की, ज्या कैद्यांना फाशी झाली आहे, त्या कैद्यांना फाशी दिली जाऊ नये. हे माझे वैयक्तिक मत असले तरी त्याला कराराची अट करता येईल की नाही हे सांगता येणार नाही.

माझे मस्तक मानवतेसाठी अर्पण

भगतसिंगांचे क्रांतिकारी आदर्श गांधींना माहिती नव्हते असे नाही, त्यांचे शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांप्रती असलेली बांधिलकी महात्मा गांधींना चांगलीच ठाऊक होती. पण अहिंसेच्या तत्त्वबद्दल भगतसिंग अगदी विरोधी होते. कराचीत ज्यावेळी महात्मा गांधी अधिवेशनात बोलायला उभा राहिले आणि म्हणाले की मी शेतकरी आणि मजुरांच्या जन्मापासून सेवा करत आहे. मी स्वतःत्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांची सुख दुःखं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून तेव्हापासून मी माझे मस्तक मानवतेसाठी अर्पण केल्याचे सांगतात.

भगतसिंग ही त्यांच्या भूमिकेवर ठाम

भगतसिंगांना फाशी झाल्यानंतर कानपूरमध्ये भीषण दंगल उसळली. महात्मा गांधींना वृत्तपत्रातून आलेल्या बातमीतून समजतं की, भगतसिंगांच्या फाशीनंतर कानपूरमधील हिंदू पेटून उठले आहेत. आणि भगतसिंगांच्या हौतात्म्याचे स्मरण ठेऊन जे कोणी दुकान बंद ठेवणार नाहीत त्याकाळी त्यांनाही धमकावण्यात येऊ लागले. म्हणून गांधीजी म्हणतात की, भगतसिंगांचा आत्मा कानपूरमधील घटना पाहत असेल तर त्याला प्रचंड दुःख आणि त्याला वेदना होत असतील आणि कदाचित या कृत्याचा त्याला लाजही वाटेत असेल. मी हे सांगतो कारण मला माहिती आहे की, भगतसिंग ही त्यांच्या भूमिकेवर ठाम होता.

ते शूर आहेत पण त्यांचे मन जागेवर नाही

महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी एक महिना अगोदर गांधी व्हाईसरॉयला भेटायला गेले होते. यावेळी त्यांची शिक्षा ही पुढे ढकलण्याची मागणी केली होती. १८ फेब्रुवारी १९३१ रोजी गांधी स्पष्टपणे म्हणाले की, ‘मी त्यांच्याशी भगतसिंगांबद्दल बोललो. आणि म्हणालोही आहे की, ते शूर आहेत पण त्यांचे मन जागेवर नाही. त्यामुळे या तरुणांना झालेली फाशीची शिक्षा मला मान्य नाही. कारण फाशी ही वाईटच गोष्ट आहे. कारण ती माणसाली सुधारण्याची संधी देत नाही. त्यामुळे मानवतावादातून मी हे सांगू इच्छितू की, देशात कोणतेही वादळ तयार होऊ नये असं वाटत असेल तर त्याची शिक्षा पुढे ढकलण्यात यावी.

सुरुवातीपासूनच भगतसिंगांबद्दल गैरसमज

ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीपासूनच भगतसिंगांबद्दल गैरसमज होता.क्रांतिकारकांच्या मोडस ऑपरेंडीबद्दलचा हा गैरसमज त्या काळात भारतीयांच्या मोठ्या वर्गातही होता. हिंसक आणि अतिउत्साही दृष्टिकोनामुळे ब्रिटिश सरकारने या क्रांतींबाबत अत्यंत कठोर निर्णय घेतला होता. या तरुणांचा उत्साह पाहून गांधींच्यासह अनेक नेते प्रभावित झाले होते. मात्र त्यांची कार्यपद्धत त्यांना चुकीची वाटत होती. त्यामुळे भगतसिंग जेव्हा तुरुंगात स्वत:च्या व त्यांच्या साथीदारांच्या गैरवर्तनाच्या विरोधात उपोषणाला बसले आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांची बाजू मांडली होती, त्यानंतर गांधींनी नेहरूंना पत्र लिहून त्या घटनेबद्दल ‘विसंगत’ असे म्हटले होते.

भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांबद्दल इंग्रज सरकारला कमालीची भीती वाटू लागली. म्हणून भगतसिंगला फाशी दिल्यानंतर, गांधी, नेहरू आणि पटेल इत्यादींची वैयक्तिक प्रतिक्रिया काय असतील याकडे ब्रिटीश गुप्तचरदेखील गुंतले होते.

तेव्हा मात्र महात्मा गांधी स्तब्ध

भगतसिंगांच्या फाशीचा दिवस जस जसा जवळ येऊ लागला तस तसे महात्मा गांधींच्या मनात भगतसिंगांबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. आणि ज्या दिवशी फाशी देणार असं गांधींना समजलं तेव्हा मात्र महात्मा गांधी स्तब्ध झाले.आणि ज्यावेळी भगतसिंगांना फाशी देण्यात आली त्यावेळी महात्मा गांधीजी म्हणाले की, भगतसिंग आणि त्यांचे साथीदार शहीद झाले आहेत, त्यांच्या निधनामुळे हजारो लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मरणार्थ खूप काही बोलता येईल पण ब्रिटिश सरकारने त्यांना फाशी देऊन गंभीर चुक केली आहे पण स्वातंत्र्या मिळवण्याच्या या लढाईत ते कायम अमर राहिले आहेत.
संबंधित बातम्या

Gujrat Election : पाच राज्यातील पराभवानंतर आता काँग्रेसचं मिशन गुजरात!, BJP आणि AAP ला रोखण्यासाठी खास रणनिती

School : दप्तराचं ओझं होणार आणखी कमी, सर्व धडे एकाच पुस्तकात, काय आहे शिक्षण विभागाचा नवा निर्णय?

विधानसभा अधिवेशनानंतर ओबीसींच्या मुद्यांवर राज्य सरकार उच्चस्तरीय बैठक घेणार – दशरथदादा पाटील