मुंबई : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. आणि दुसरीकडे अयोध्या दौऱ्याबाबत 3 वर्षांपूर्वी राज ठाकरेंचं काय मत होतं, त्याचं पोस्टर शिवसेनेकडून (Shivsena) लावलं गेलं. याआधी जेव्हा शिवसेना-भाजपात वितुष्ट होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढलं होतं. ज्यात एकीकडे राम लक्ष्मण दगडावर बसले होते. दुसरीकडे भाजप, विश्व हिंदू परिषद आणि उद्धव ठाकरेंच्या (Cm Uddhav Thackeray) अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली होती. त्यावेळी नेत्यांचे अयोध्या दौरे पाहून रामाच्या मनातला भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या होत्या. अहो देश घातलात खड्ड्यात. आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे, लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते, ‘राममंदिर’ नव्हे! आज नेमकं याच्याउलट चित्र आहे. स्वतः राज ठाकरे अयोध्या दौरा करणारयेत. मशिदीवरच्या भोंग्याविरोधातल्या आंदोलनामुळे दंगली घडवण्याचा आरोप होतोय. धर्म, अयोध्या दौरा आणि धार्मिक प्रश्नांवरुन जे आज सत्ताधारी बोलतायत., नेमकं तंतोतत तीच गोष्ट 3 वर्षांपूर्वी राज ठाकरे बोलत होते.
अयोध्येतल्या मशिदीवरच्या जागेवर राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे, या भूमिकेवर राज ठाकरे कायम ठाम राहिलेयत. मात्र रामावरुन राजकारण नको, हे सुद्धा ते वारंवार सांगत आलेयत. आता परिस्थिती बदललीय. गेल्या 2 सभांमध्ये राज ठाकरेंनी मराठीचा मुद्द्यावर चकार शब्द काढलेला नाही. त्याउलट मराठी माणूस हिंदू कधी होणार, असा प्रश्न त्यांनी ठाण्यातल्या सभेत विचारला. कोणताही पक्ष घासून गुळगुळीत झालेल्या मळलेल्या रस्त्यांवरुन पुढे जात नाही. ताठर भूमिकांऐवजी ज्यांनी लवचिकता स्वीकारली., तेच राजकारणात टिकल्याची उदाहरणं आहेत. पण भूमिकाबदलाचा आरोप राज ठाकरेंना मान्य नाही. मात्र निवडणुका जिंकायच्या असतील, तर फासे बदलावे लागतील., हे स्वतः राज ठाकरेच एकदा म्हटले होते.
तर दुसरीकडे राज ठाकरेंंवर महाविकास आघाडीने झोड उडवली आहे. त्यांना कुठे जायचं तिकडे जाऊद्या, असे म्हणत महाविकास आघाडी राज ठाकरेंना फार गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीये. राज ठाकरेंकडून मात्र महाविकास आघाडीवर सतत जोरदार प्रहार सुरू आहे. ही हिंदुत्वाची भूमिका मनसेला पटरीवर आणणार की नाही, हे येणाऱ्या काळात कळेलच.
Ganesh Naik : गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, अटकेची टांगती तलवार! सूत्रांची माहिती