मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : एक असं नाव ज्यांच्या शिवाय हिंदी सिनेसृष्टी बेसूर वाटते… ज्यांच्या गझलांशिवाय प्रेमाची व्याख्या अपूर्ण वाटते. प्रेमाची अर्थपूर्ण कविता अन् शब्दांचा जादूगार अर्थात साहिर लुधियानवी… ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीला सदाबहार गाणी देत समृद्ध केलं. तरूणाईच्या प्रेमभावनेला व्यक्त करायला गझलेच्या रुपात शब्द दिले, त्या गझलकार, गीतकार आणि अजरामर कवी साहिर लुधायानवी यांचा आज स्मृतीदिन…
साहिर लुधियानवी यांच्या गझल म्हणजे जगण्याचा सार… प्रेमाचा खरा अर्थ. साहिर यांच्या गीतांविना हिंदी सिनेसृष्टीची कल्पनाही निरर्थक वाटते… साहिर यांच्या गीतामधून आपल्या भावना आपल्या प्रेयसी, प्रियकरापर्यंत पोहोचवणं अधिक सोपं जातं… जेव्हा प्रेयसी प्रियकराचा निरोप घेत असते. पण या भेटीने अद्याप मन भरलेलं नसतं. तिने आणखी काहीवेळ थांबावं असं त्याला वाटत असतं, तेव्हा साहिर लुधियानवी यांचं अभी ना जाओ छोड कर, दिल अभी भरा नहीं यांचं गाणं त्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसं ठरतं.
जेव्हा आपल्या मनातील अव्यक्त भावना आपल्या प्रिय व्यक्तीला सांगता येत नाही. मनात घालमेल सुरु असते, तेव्हा मेरे दिल में आज क्या है, तू कहे तो मैं बता दूँ… हे गीत तुम्हाला जवळचं वाटतं. चलो एक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों हे गीत तर स्वत:मध्ये प्रचंड अर्थपूर्ण आहे.
साहिर यांच्या कविता म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीमधील संवाद आहे… साहिर यांची गीतं ऐकणं म्हणजे प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यातला संवाद ऐकणं होय… ही सगळी जरी प्रेमगीतं असली तरी त्याला एक किनार आहे ती अपूर्णत्वाची… जर मनातील सगळ्याच भावना पूर्ण झाल्या असत्या तर कदाचित साहिर यांच्याकडून इतक्या अर्थपूर्ण कविता लिहिल्या गेल्या नसत्या… याच अपूर्णत्वाला दर्शवणारं साहिर यांचं हे गीत ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें…
साहिर म्हणजे शब्दांचा जादूगार… नावाला साजेशाच त्यांनी अर्थपूर्ण गझला लिहिल्या. तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारें हम क्या देखें… उडे जब जब जुल्फे तेरी, हम आंखों में… ऐ मेरी ज़ोहरजबीन… ही त्यांची गीतं म्हणजे प्रियकराकडून प्रेयसीच्या सौंदर्याचं केलेलं यथेच्छ वर्णन आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया… ही गीतं म्हणजे साहिर यांच्या जगण्याचं मर्म आहे.
एवढी प्रेम गीतं लिहिणारे साहिर ताजमहलबाबत मात्र बंडखोर कविता लिहितात. ते म्हणतात इक शहंशाहने दौलत का सहारा ले कर, हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़… मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से… असं लिहिण्याचं धाडस केवळ साहिरच करु शकतात.
इतक्या अर्थपूर्ण कविता, इतक्या अर्थपूर्ण गझला अन् गीतं लिहिल्यानंतर साहिर म्हणता…
मैं दो पल का शायर हूं, दो पल मेरी कहानी है पल दो…
पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है…
मुझ से पहले कितने शायर आए और आ कर चले गए..
कुछ आहें भर कर लौट गए कुछ नग़्मे गा कर चले गए…
वो भी इक पल का क़िस्सा थे मैं भी इक पल का क़िस्सा हूं…