कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेवटचं टोक म्हणजे चंदगड तालुका. कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला निसर्गसंपन्नतेने नटलेला असा हा तालुका. गावातील विकास कामांचा आणि चंदगड (Chandgad) तालुक्यातील गावांचा तसा दुरान्वये संबंध. बहुंताशी गावातून पहिली ते चौथी पर्यंतच शाळा. आता वाहनांची सोय झाल्यामुळे शिक्षणाच्या वाटेवर चंदगड तालुका आता खूप पुढं गेला आहे. चंदगड तालुक्यातील काजिर्णे (Kajirne) हे गावही अगदी छोटं. पंचवीस सव्वीस उंबऱ्यांचं. गावाची ग्रामपंचायत पण ग्रुप ग्रामपंचायत.
साधा रहिवासी दाखला काढायचा झाला तरी मग सहा सात कि. मी. पायपीठ करुन म्हाळुंगे गावात जायचं आणि ग्रामसेवक किंवा क्लार्क असेल दाखला घ्यायचा नाही तर उद्या पुन्हा हाच खेळ करत दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये सकाळी लवकर जाऊन थांबायचं. मग दाखल मिळणार आणि नंतर पुढची कामं झाली तर करायची. या सगळ्या व्यवस्थेत बाई मात्र फक्त चूल आणि मुल एवढ्यातच गुंतून राहिलेली. म्हणून मग ज्यांनी नोकरीसाठी गाव सोडलं त्यांच्या मुलांना मात्र चौथी नंतरची शाळा शिकायला मिळाली आणि ती गावाकडची पोरं पुढं पुढं जात राहिली, अगदी मग चंदगड तालुक्यातील डोंगराळ भागातील पोरं पार अमेरिका, जर्मनीपर्यंत गेली.
काजिर्णे गावात गेला आणि दूध डेअरी समोर उभा राहून कधी सुनीता कांबळे यांचे घर विचारला तर त्यांची आई सांगते की मी डॉक्टरन बाईची आई आहे. डॉ. सुनीता रामचंद्र कांबळे. मराठी विषयातून एम. ए., एम.फिल, नेट परीक्षेत सात वेळा उत्तीर्ण होऊन शिवाजी विद्यापीठाची 2018 साली पीएच. डी मिळवली.
प्रा. डॉ. सुनीता कांबळे आता रणजित देसाई यांच्या कोवाड कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापिका असल्या तरी त्यांच्या या यशात त्यांच्या मायमाऊलीचाच खरा वाटा आहे. वडील दौलत शेतकरी सहकारी साखर काखान्यात सुरक्षा विभागात नोकरीला. 15-16 वर्षे नोकरी झालेली असतानाच दौलत कारखाना कर्जबाजारी झाला आणि सुनिताच्या वडिलांचा कारखान्याती पगार थांबत गेले. नंतर नंतर पगार बंद होता, होता कालांतराने कारखाना बंद झाला आणि नोकरीचा एक पैसाही न घेता सुनीताचे वडील कारखान्यातून सेवानिवृत्त झाले. या काळात सुनिताचे आईने म्हणजेच पार्वती रामचंद्र कांबळे यांनी स्वतःची थोडी फार असलेली जमीन कसायला चालू केली. गावात नदी नाही म्हणून मग शेतात काजूची रोपं लावण्यात आली, आणि सुनीताच्या आई वडिलांचा कारखान्यावरुन येऊन जगण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला कारखाना ते शेत असा.
सुनिताच्या आई वडिलांचा हा शेतातील प्रवास चालू झाला आणि सुनिता कांबळे यांनीही त्यांना साथ देत आपण शिवाजी विद्यापीठात एम. ए. साठी प्रवेश घेतला. आई वडील शेतीत आणि त्यांची मुलगी शिवाजी विद्यापीठातील कमवा शिका योजनेतून काम करत शिकू लागली. कमवा शिका योजनेतून एम. ए. केल्यानंतर विद्यापीठामध्येच एम. फिल केले. या काळात एम. फिल सुरु असतानाच नेट, सेटच्या परीक्षा उत्तीर्णही त्या झाल्या. त्यानंतर त्यांना एम. फिलची पदवी घेऊन त्यांनी मग ‘ज्ञानेश्वरी आणि धम्मपद या ग्रंथांचा तौलनिक अभ्यास घेऊन’ त्यांनी पीएच. डी. केली. नोकरीसाठी प्रयत्न करुनही कायमस्वरुपी नोकरी कुठे मिळाली नाही. मग संशोधनासाठी त्यांना राजीव गांधी संशोधनवृत्ती मिळाली.
सुनिता कांबळे यांनी पीएच. डी मिळवली असली तरी शिक्षणाची अशी कोणतीच मोठी परंपरा घरात नव्हती. आई कधी शाळेला गेलीच नाही वडीलांची त्याकाळातील दहावी. त्यानंतर वडिलांनी दौलत कारखान्यात नोकरी धरली आणि त्यांनीच मग मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून साऱ्या कुटुंबालाच त्यांना हलकर्णीत आणून ठेवले. सगळे कुटुंब कारखान्यावर राहू लागले आणि मुलं शाळेत रमू लागली. खरं तर कारखान्यामुळेच मुलांच्या आयुष्यात शिक्षण आले असं त्या निरपेक्षपणे सांगतात.
माझे शिक्षण झाले ते माझ्या आई मुळेच असं डॉ. सुनिता कांबळे सांगतात. त्यापुढे जाऊन असंही म्हणतात की, ‘माझी आई अडाणी, म्हणजे शाळा तिने बघितली नाही पण आम्हा भावंडांसाठी तिने शाळा म्हणजे सर्वस्व मानले. आम्ही शाळा, कॉलेजमध्ये गेलो की आई शेतात राबायची. आबांची नोकरी होती, पण आई म्हणायची माझ्या पोरांना शाळेत काय कमी पडता कामा नये. ती शेतात आणि काजूच्या बागेत राब-राबली ते फक्त आमच्यासाठी. आज डॉ. झाले असले तरी त्या संशोधनाच्या काळात खरा आधार आणि पाठबळ होतं ते माझ्या आईचं’ म्हणूनच सुनिता कांबळे असं कुणी नाव विचारलं की त्यांची आई म्हणते माझ्या लेकीला डॉ. सुनिता कांबळे म्हणा.
संबंधित बातम्या
Women’s Day | एकत्र कुटुंबाची पंचक्रोशीत चर्चा, सर्व मुलांना उच्च शिक्षण; स्वत: अशिक्षित
सोबतच्या महिलांना Happy Women’s Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!