Marathi News Opinion What happened in Maharashtra know all the details through the accusations of Sanjay Raut and Kirit Somaiyya
संजय राऊत आणि सोमय्या यांच्या वादातून काय काय उघड झालं? समजून घ्या 13 पॉईंटर्समधून
दोघांच्या वादातून जे काही घोटाळे आणि इतर भ्रष्टाचार उघड होताना दिसतोय तो मात्र दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. त्यामुळेच वेगवेगळे नेते जे आरोप प्रत्यारोप करतायत त्यातून जे महाराष्ट्राला कळतंय त्याचा आढावा घेऊया 10 प्रमुख्य मुद्यांच्या माध्यमातून.
सोमय्या आणि राऊत वाद वाढला
Image Credit source: tv9
Follow us on
शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातला वाद इतक्यात मिटेल अशी शक्यता दिसत नाहीय. कारण राऊत रोज बाप बेटे जेलमध्ये जाणारच म्हणून सोमय्या पिता पुत्रांना इशारा देतायत तर राऊतांवर निशाना साधता साधता सोमय्या आता ठाकरे कुटुंबावरही घसरलेत. आज तर त्यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यातच फुट पाडण्याचा प्रयत्न केला. राऊत आणि सोमय्या यांच्या वादाला महाराष्ट्र कंटाळला असा सोशल मीडियावर सूर निघत असला तरीसुद्धा दोघांच्या वादातून जे काही घोटाळे आणि इतर भ्रष्टाचार उघड होताना दिसतोय तो मात्र दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. त्यामुळेच वेगवेगळे नेते जे आरोप प्रत्यारोप करतायत त्यातून जे महाराष्ट्राला कळतंय त्याचा आढावा घेऊया 13 प्रमुख्य मुद्यांच्या माध्यमातून.
ठळक मुद्दे-
अलिबागच्या कोर्लाई ह्या गावात रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी जागा खरेदी केली. त्या जागेवर 19 बंगले बांधले गेले होते असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. त्यातून महाराष्ट्राला पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या घरातून अशी काही प्रॉपर्टी खरेदी केली गेल्याचं पहिल्यांदाच कळालं. त्यावर मोठा वाद होतोय.
रश्मी उद्धव ठाकरे ह्या कोर्लाई गावातल्या प्रॉपर्टीचा टॅक्स भरत होत्या. घरपट्टी भरत होत्या. ते बंगलेच आता गायब असल्याची तक्रार सोमय्या करतायत. म्हणजे ज्या घरांचा टॅक्स भरला जातोय तेच चोरीला गेल्याचं सोमय्यांची तक्रार आहे. जर घरच जाग्यावर नसतील तर मग घरपट्टी कशाची भरली जात होती असाही सवाल सोमय्या विचारतायत.
ज्यांच्याकडून रश्मी ठाकरेंनी कोर्लाईत प्रॉपर्टी विकत घेतली त्या अन्वय नाईकांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या आईनेही प्रॉपर्टीच्या वादातूनच जीवन संपवलेलं आहे. हे तेच अन्वय नाईक आहेत, ज्यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीला रायगड पोलीसांनी अटक केली होती. रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांचा व्यवहार काही वर्ष जूना आहे.
रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांनीही हिंदू देवस्थानाची जागा विकत घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. तेही पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळतंय.
रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांचे संबंध हे फक्त शिवसेनेतल्या पदापुरतेच मर्यादीत नाहीत. रश्मी ठाकरे ज्या सामनाच्या संपादक आहेत, त्याचे कार्यकारी संपादक हे संजय राऊत आहेत. संजय राऊतांना टार्गेट करत करत सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही टार्गेट केलेलं दिसतंय.
महाराष्ट्रात एवढे गंभीर आरोप होऊनही मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पत्नीकडून एका ओळीचही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
किरीट सोमय्यांनी ईडीच्या नावावर वसुली केली, एवढच नाही तर त्यांचा मुलगा नील सोमय्या यानेही नियम पायदळी तुडवीत प्रॉपर्टी खरेदी केल्याचा वाद पुन्हा समोर आला.
400 कोटीला मारा गोळी असं सोमय्या आरोपांच्या उत्तरात म्हणालेत. त्यांच्या मुलावर 400 कोटीच्या प्रॉपर्टीचा आरोप आहे. गोळी मारा म्हणजे 400 कोटी रक्कम अगदीच मामुली असल्याचा भासवण्याचा प्रयत्न सोमय्या करतायत.
फडणवीसांच्या काळात 25 हजार कोटीचा आयटी घोटाळा झाल्याचं पुन्हा चर्चेत आलं. विशेष म्हणजे हा घोटाळा होत असताना खुद्द शिवसेनाही त्या सरकारचा भाग होती पण त्यावेळेस मात्र कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. आता मात्र राऊतांनी तो घोटाळा उकरुन काढला.
पहिल्या दिवशी फडणवीसांवर थेट आरोप करणारे राऊत दुसऱ्या दिवशी मात्र फडणवीसांना अशा घोटाळ्याची कल्पना नसावी असं म्हणत क्लीनचिट देत राहीले. एवढा मोठा घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांना माहितच नाही? कसं काय अशा विचारात नेटीझन्सही पडले.
ज्या साडे तीन नेत्यांना राऊत जेलमध्ये टाकायला निघाले, त्यातल्या मोहीत कंबोज यांनी ये मेरा पैसा वापर कर अशा भाषेत राऊतांवर ट्विट केलं. म्हणजे ज्या कंबोजला मी ओळखतच नाही असं राऊत म्हणाले, त्यांच्याकडून राऊतांनी पैसे घेतल्याचा आरोप होताना महाराष्ट्रानं पाहिलं.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे बाळासाहेबांच्या काळात मातोश्रीवर बेल वाजवली की हजर होणाऱ्या बॉयचं काम करायचे हे राणेंनी महाराष्ट्राला पहिल्यांदा कळवलं तर रोज उठसुठ शिवसेनेवर टीका करणाऱ्या राणेंनी त्यांच्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्र्यांना त्याच मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून 7 वेळा फोन केल्याचही नार्वेकरांनी उघड केलं.
प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय ते ईडीच्या ताब्यात, सुजीत पाटकर हेही राऊतांचे निकटवर्तीय तेही ईडीच्या रडारवर आणि खुद्द राऊतांच्या दोन्ही मुलीही त्यामुळे गोत्यात येताना महाराष्ट्र पहातोय. शेवट काय तर सत्तेच्या भोवती प्रॉपर्टी आणि प्रॉपर्ट्यांच्या भोवती सत्तेचा खेळ चालवला गेल्याचं महाराष्ट्र पहातोय.