शेतकरी आंदोलनाचा आजचा 37 वा दिवस आहे. शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यामध्ये आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. मात्र, अजूनही या बैठकांमधून पूर्ण तोडगा निघालेला नाही.
शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांचं 50 टक्के समाधान झाल्याचं सांगतिलं होतं. तसेच आगामी 4 जानेवारीच्या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा होईल असेही ते म्हणाले.
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी (31 डिसेंबर) नमन करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या आंदोलनात आतापर्यंत 40 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर मेणबत्त्या, दिवे प्रज्वलित करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी प्रतिनिधी आणि सरकारमध्ये 4 जानेवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत सहमती नसलेल्या मुद्द्यांवर तोडगा निघणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.