आपल्या कसदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून अचानक बॉलिवूडला रामराम ठोकणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये होऊन गेले. अशा कलाकारांपैकी अभिनेत्री झायरा वसीम सुद्धा एक.
झायरानं 'दंगल गर्ल' म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. तिला 'दंगल' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
पण बॉलिवूडमध्ये बस्तान बसत असतानाच अवघे तीन सिनेमे केल्यानंतर तिने अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. बॉलिवूडमधील या अल्पकाळातही ती या ना त्या कारणाने वादात होती.
तिनं बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे दिले. 'दंगल'मध्ये अभिनयाच्या जोरावर धमाल केल्यानंतर तिनं अभिनेता आमीर खानसोबत 'सिक्रेट सुपरस्टार' मध्ये जबरदस्त काम केलं. या सिनेमानंतर तिचं मोठ्या प्रमाणात कौतुकही झालं आणि सोबतच प्रसिद्धीसुद्धा मिळाली.
तर तिचा तिसरा सिनेमा होता 'द स्काय इज पिंक'. अभिनेत्री प्रियंका चोपडासोबत या सिनेमात झायरानं कमाल अभिनय केला. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
अचानक झायरानं अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आपण करत असलेल्या कामापासून खूश नाही आणि सतत इस्लाम धर्मापासून लांब जात असल्याची जाणीव होतं असल्याचं तिनं सोशल मीडियावर लिहिलं होतं. सोशल मीडियावर या नंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली.
सोबतच विमानात घडलेल्या प्रकारानंतरही ती चर्चेत होती. दिल्ली ते मुंबई विमान प्रवासादरम्यान झायरानं एका व्हिडिओद्वारे विमानात तिचा छळ झाल्याची माहिती दिली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.