आज धनत्रयोदशी आहे. सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत आहे. मात्र, ज्यांना कुणाचा आधार नाही किंवा जे लोक वृद्धाश्रमात आपलं उर्वरित जीवन व्यतीत करत आहेत, अशा वृद्धांसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खास दिवाळी साजरी केली.
अमरावतीमधील मधुबन वृद्धाश्रमात बच्चू कडू यांनी वृद्धांसोबत दिवाळीचा आनंद लुटला. बच्चू कडू यांनी सकाळी मधुबन वृद्धाश्रमातील वृद्धांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घातलं.
सर्वांना नव्या कपड्यांचं वाटप केलं. महिलांना साडीचोळी तसंच शॉल देण्यात आली.
सर्वांना खास पुरणपोळीचं जेवण घालत, बच्चू कडू यांनी स्वत: जेवण वाढलं. यावेळी वृद्धाश्रमातील सर्वांचे डोळे पाणावले होते. जिथे पोटच्या पोरांनी या वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवलं. तिथे बच्चू कडू यांच्यासारख्या एका मंत्र्यांने दाखवलेला जिव्हाळा या वृद्धांच्या मनाला मायेची उब निर्माण करणारा ठरला.
बच्चू कडू यांची प्रहार संघटना राज्यभरातील दिव्यांग लोकांसाठी काम करत आली आहे. दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात बच्चू कडू कायम अग्रेसर असतात. त्याचबरोबर अनेक निराधारांनाही बच्चू कडू यांनी मोठा आधार दिला आहे.