भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
सध्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.
भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते.
सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली.
या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या.
किशोरी पेडणेकर यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या
मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.