विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (19 ऑक्टोबर) ओल्या दुष्काळाने प्रभावित झालेल्या भागात भेट दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
दौंड तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशीदेखील संवाद साधला.
नुकसानग्रस्त शेतीचे फोटो त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क झालेला नाही. आठ दिवसांपासून वीजही आलेली नाही. संकट अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि इतर ग्रामस्थांच्या भेटी घेऊन, त्यांची चौकशीदेखील केली.
शेतकऱ्यांचा ऊस, सोयाबीन, कांदा सर्व काही नेस्तानाबूत झालं आहे. अधिकारी अजूनही आलेले नाहीत. पंचनामे झाले नाहीत. मुळात पंचनाम्याची गरजच नाही. शेतीचं शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी म्हणून आम्ही सरकारवर दबाव आणू, असं फडणवीस यावेळी म्हणाले.