‘दिल से रे’, ‘बॉम्बे’ आणि ‘सौदागर’सारख्या चित्रपटांत अविस्मरणीय अभिनय करणारी अभिनेत्री मनिषा कोईरालाहिला 29 नोव्हेंबर 2012 रोजी कर्करोगाचे निदान झाले होते. यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतर तिने आपला हा प्रवास पुस्तकाच्या रुपात चाहत्यांच्या भेटीला आणला होता.
अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, लेखिका ताहीरा कश्यपला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. ताहीराने तिच्या या लढ्यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या प्रवासावर आधारित सात भागांची कथा तिने सादर केली होती.
90च्या दशकाची सुपरहिट अभिनेत्री सोनाली बेंद्रेला गेल्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले होते. न्यूयॉर्कमध्ये बऱ्याचकाळाच्या उपचारानंतर तिने कर्करोगावर यशस्वी मात केली.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रेला 2009मध्ये एका दुर्मिळ कर्करोगाची लागण झाली होती. 2010मध्ये तिने कर्करोगमुक्त झाल्याची घोषणा केली होती.
अभिनेता हृतिक रोशनचे वडील दिग्दर्शक-अभिनेते राकेश रोशन यांना 2018मध्ये घशाच्या कर्करोगाने ग्रासले होते. शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीनंतर त्यांनी कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली होती.
चित्रपट दिग्दर्शक अनुराग बासुंना 2004मध्ये रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली होती. या उपचारादरम्यान त्यांनी ‘लाइफ इन मेट्रो’, ‘गँगस्टर’ आदी चित्रपटांची कथा लिहिली होती. उपचारानंतर त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली होती.