लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगर-दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.
पळसाची फुलं ही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बुलडाण्याला लागून असलेल्या राजुर घाटातील चित्रही सध्या असंच काही आहे..
शिशीराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की , वसंताची चाहूल लागते. या वसंतात निसर्गाच्या रंगांची उधळण, रंगोत्सव सुरू होतो.
शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस बहरला आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी नटलेला पळस चारही बाजूला पाहायला मिळत आहे.
झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे लाल दिसत आहेत. 20-25 फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी बहरलेले झाड असा होतो.
पळसाची फुले सरस्वती आणि कालिमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी वापरली जातात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत.
फार पूर्वीपासूनच मोठय़ा पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात असे. तर कुरडई , खारुड्या बनवण्यासाठी सुद्धा पळसाच्या पानांचा वापर महिला करायच्या. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.
पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या धुऱ्या-बांधावर दिसणारा वृक्ष आहे. त्याची उंची जास्त नसते. तो पानगळी वृक्ष आहे.
त्याचे खोड आणि फांद्या वेडय़ावाकडय़ा असतात. तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते. पाने आकाराने मोठी असतात म्हणूनच त्याचा द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी वापर करतात.
सर्व पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे घुमारे फुटतात. सध्या पळसाची झाडे लाल, केशरी, भगवा आणि पिवळा अशा रंगांच्या फुलांनी बहरलेली दिसत आहेत.
शेतात जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना तो दिसत आहे. बहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा दिसू लागला आहे.