एक मुलगा निवांतपणे चालत जात असतानाच अचानक त्याच्या डोक्यात सळी घुसल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 28 डिसेंबरची ही घटना असून आता या घटनेचं सीसीट्वीह फुटेज समोर आलं आहे.
पुण्यातील मुंढवा येथील भारत फोर्स कंपनी शेजारील साई पार्क सोसायटीमध्ये खाजगी केबलचं काम सुरु होतं. त्यावेळी खासगी व्यवसायिकाच्या निष्काळजीपणामुळे एका बारा वर्षीय चिमुरड्याचा जीव धोक्यात आला आहे.
मुंढवा येथील साई पार्क सोसायटी आणि आसपासच्या परिसरात खाजगी केबल नेटवर्कचे अनधिकृत जाळं आहे. तेथील नागरिकांच्या घरांवरून केबल्स टाकलेल्या आहेत. याठिकाणी काम सुरु असताना खालून जाणाऱ्या एका मुलाला गंभीर इजा झाली. त्याच्या डोक्यातच थेट सळी घुसली!
घराच्या चौथ्या मजल्यावरून केबलची वायर ओढत असताना, वायर ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चार फुटांची लोखंडी सळी केबल व्यवसायिकाच्या निष्काळजीपणामुळे चाळीस फुटांवरून निसटली. ही सळी निसटली तेव्हा नेमका खालून जाणाऱ्या मुलाच्या थेट डोक्यावरच ही सळी उभी घुसली. ही सळी घुसल्यानंतर नेमकं झालं काय, हे काही काळ या चिमुकल्याला कळलंही नाही.
डोक्यात सळी घुसल्यानंतर हा बारा वर्षांचा चिमुरडा गंभीररीत्या जखमी झाला आहे. सध्या एका खासगी रुग्णालयात या चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित केबल चालकावर या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.