तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) महाराष्ट्रातही मोठं नुकसान झालं आहे. कोकणासह मुंबई उपनगरालाही तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे.
उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Randive) या 90 वर्षांच्या आहेत.
सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या.
“या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या.
16-17 मे रोजी आलेल्या तौत्के चक्रीवादळाने वसई-विरार समुद्र किनाऱ्याला मोठा फटका बसला होता. याच परिसरात न्यू लाईफ फाऊंडेशन हे वृद्धाश्रम आहे.
या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिक्षिका सुमन जवळपास दोन डझन वृद्धांसह राहतात.
तौत्के चक्रीवादळाने या वृद्धाश्रमाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे या शिक्षिकेने आता आपल्या विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.
या वृद्धाश्रमाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 ची टीम तिथे पोहोचली. चक्रीवादळाने झालेलं नुकसान अतोनात आहे. तोंडावर पावसाळा असताना वृद्धाश्रमाची डागडुजी तातडीने करण्याची गरज आहे.
वृद्धाश्रमाचा पहिला मजला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे तळमजल्यावर सर्व वृद्ध राहात आहेत.
“हे वृद्धाश्रम चालकांच्या मते, आतापर्यंत 10 ते 12 लाखांचं नुकसान झालं आहे. मात्र मोठी धाकधूक ही आहे की जर पावसाळ्यापूर्वी जर हे ठिक झालं नाही, तर वृद्धांना पाण्यात राहावं लागेल”, असं त्यांनी सांगितलं.
सध्याचं कोरोनाचं संकट, त्यात वादळाचा तडाखा आणि वृद्धाश्रमाचं झालेलं नुकसान, अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग राहू द्या, निदान झोपण्यासाठी तरी जागा मिळू द्या, अशी अवस्था इथल्या वृद्धांची झाली आहे. त्यामुळेच या 90 वर्षीय शिक्षिकेने आपल्या ‘यशस्वी’ विद्यार्थ्यांकडे मदतीची याचना केली आहे.