नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात भाविकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मात्र, या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी प्रवेशबंदीचे तीनतेरा वाजवल्याचं पाहायला मिळालं.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह शेजारी राज्य असलेल्या आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळं नवरात्र काळात लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.
पण यावर्षी नवरात्रोत्सव काळात भाविकांना तुळजापूरात बंदी घालण्यात आली आहे. तसंच नवरात्रोत्सव अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जाणार आहे.
पण सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवत प्रवेशबंदीच्या पहिल्याच दिवशी भाविक मोठ्या संख्येनं तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. देवीची ज्योत घेऊन जाण्यासाठी राज्यभरातून भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत.