बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या परिस्थितीत बऱ्याच लोकांना सर्दी, खोकल्याचा त्रासही होऊ शकतो. तुम्हाला जर कोरड्या खोकल्याची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही घरातील काही घरगुती उपाय करू शकता. त्याने खोकला कमी होईल.
मध - कोरड्या खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे खोकला व घशातील खवखव कमी होते.
हळद - हळद हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. कोरडा खोकला दूर करण्यासाठी तुम्ही दुधात हळद घालून पिऊ शकता. त्यासाठी एक कप दूध गरम करून त्यात थोडी साखर व अर्धा चमचा हळद घालावी. हे नीट ढवळून दूध प्यावे.
आलं - खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचेही सेवन करता येते. यासाठी एका भांड्याच अर्धा चमचा आल्याचा रस घेऊन त्यात एक चमचा मध घाला. ते गरम करा. थोडं गार झाल्यावर हे सेवन करा. यामुळे कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होईल.
ज्येष्ठमध - तुम्ही चहाच्या स्वरूपात ज्येष्ठमध सेवन करू शकता. यामुळे कोरडा खोकला दूर होण्यास मदत होईल. तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा ज्येष्ठमधाचा चहा पिऊ शकता. चहा बनवण्यासाठी ज्येष्ठमधाची मुळे पाण्यात उकळावीत.