राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणगाव ते अमळनेर रस्त्यावर घडली.
अमळनेर येथून कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या (एमएच 19 सीई 19) क्रमांकाच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते.
कारचा टायर फुटल्यानंतर कार चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
एकनाथ खडसे या अपघातातून बालंबाल बचावले.
धरणगावपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला.
चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवल्याने कार उलटली नाही आणि सुखरुप असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी ट्वीट करुन दिली आहे.