केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून पायी निघालेलं शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत कोणत्याही क्षणी धडकण्याच्या मार्गावर आहे.
सुमारे 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या असून मुक्काम करत करत हे सर्वजण मुंबईच्या आझाद मैदानात येत आहेत.घोषणा देत, गाणी म्हणत, ढोल वाजवत आणि हातात लाल बावटा घेऊन शेतकऱ्यांचा हा जत्था कसारा घाटापर्यंत आला आहे.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित नवले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकवरून सुरू झाला. काल संध्याकाळी अखिल भारतीय किसान सभेचा हा लाँग मार्च सुरू झाला. एकूण 21 जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.
त्यानंतर ते आझाद मैदानाकडे जातील, तिथे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या संयुक्त धरणे संघर्ष आज सकाळी सुरू झाला आणि प्रजासत्ताक दिनापर्यंत सुरू राहणार आहे. उद्या 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आझाद मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे.
त्यानंतर राजभवनाकडे 50,000 लोकांची जोरदार रॅली काढत राज्यपालांना निवेदन देण्यात येईल.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाचा समारोप होईल, राष्ट्रध्वज फडकवत, राष्ट्रगीत गात आणि शेतकरी आणि कामगारांच्या सध्याच्या संघर्षाला सर्व किंमतींनी विजयी करण्याचा संकल्प घेऊन आंदोलन करण्यात येईल.