थंडीच्या दिवसात केस जास्त गळतात आणि त्यामागे अनेक कारणे असू शकतात. थंडीत केसांमधील ओलावा कमी झाल्यामुळे कोंड्याची समस्या सुरू होते, त्यामुळे केस गळतात. तसेच बाहेरील कोरड्या हवेमुळेही केसांचे नुकसान होऊन ते गळू लागतात. काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही केसगळती रोखू शकता.
तेलाने मसाज करणे : आपली आई किंवा आजी जो सल्ला द्यायच्या तोच सल्ला ब्युटी एक्स्पर्ट्सही देतात. आठवड्यातून दोन वेळा तरी केसांना तेल लावल्याने केसांना पोषण तर मिळतेच पण त्यांच्यातील ओलावाही कायम राहतो. यामुळे केस कोरडे रहात नाही. अवघ्या काही दिवसांत तुम्हाला फरक दिसून येईल.
हीटिंग टूल्समुळे होते नुकसान : केसांसाठी हीटिंग टूल्सचा वापर करणे हे आजकाल खूप सामान्य झाले आहे, पण यामुळे केस कमकुवत आणि निर्जीव होऊ शकतात. केसगळतीचे सर्वात मोठे कारण मानले जाणाऱ्या हीटिंग टूल्सपासून जेवढे लांब रहाल तेवढे चांगले असते.
पौष्टिक आहार घ्या : आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवर आणि केसांवरही होतो. खराब आहारामुळे केस गळू शकतात, म्हणून जीवनसत्त्वे आणि खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबी असलेल्या आहाराचे सेवन करावे.
पुरेसे पाणी प्या : हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात, परंतु आपण दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. पुरेस पाणी न प्यायल्यास केस गळणे, निस्तेज त्वचा अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अधिकाधिक पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा.