काही दिवसांपूर्वी भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असणाऱ्या गीता यथार्थ यांनी फेसबुकवर स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्या बाथरूमच्या कमोडवर बसल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडा ठेवला आहे. सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते.
त्यानंतर फेसबुकसह सोशल मीडियावर संस्कृतीरक्षक विरुद्ध उदारमतवादी असा वाद रंगला आहे. हे आईपणाचं उदात्तीकरण आहे की खरंच महिलांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, याविषयी विविध मुद्दे मांडले जात आहेत.
गीता यथार्थ यांनी सिंगल पॅरेटिंगमधील आव्हानं काय असतात, हे समजण्याच्या उद्देशाने हा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. मात्र, त्यावरून काही स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी गीता यथार्थ यांना ट्रोल करायला सुरुवात केले.
गीता यथार्थ यांनी महिला सबलीकरण किंवा महिला सक्षमीकरणावर बोलण्याची ही पहिली वेळ नाही.
अशी अनेक मतं त्या आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांची ही बेधडक बोलण्याची शैली अनेकांच्या पचनी पडत नाही.
परंतु, ‘मैं, तुम खाली दिमाग, गालीबाजों के लिए ही लिखती हूं कई बार.’, असं म्हणत त्या अशा ट्रोल करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर देतात.
‘जब तक शरीरसे सांस खुद न निकल जाये, तब तक लडना..’, असं म्हणत त्या इतर महिलांनाही प्रोत्साहन देतात.