सध्या संपूर्ण राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रासह मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात धुळवड खेळली जात आहे. यानिमित्ताने एकमेकांवर रंगाची उधळण केली जाते.
अनेकदा रंगाची उधळण करताना आपल्या एखाद्या आवडत्या टॉपवर किंवा पँटवर रंगाचे डाग पडतात आणि यामुळे आपली इच्छा नसतानाही तो टॉप आपल्याला फेकून द्यावा लागतो.
पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या कपड्यांवर पडलेले डाग कसे घालवायचे याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कपड्यांवरचे डाग सहज घालवू शकता.
कोमट पाण्यात अर्धा कप पांढरा व्हिनेगर आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. यानंतर तुमचा डाग पडलेला टॉप त्यात तासभर भिजवा आणि नंतर डिटर्जंट पावडर घेऊन हलक्या हाताने तो घासून घ्या. रंगाचा डाग नाहीसा होईल.
जुने आणि आंबट दही घ्या आणि त्यात डाग पडलेले कपडे काही वेळ भिजवा. यानंतर ते धुवा. ही प्रक्रिया दोन-तीन वेळा केल्याने डाग कमी होईल.
कपडे पाण्यात धुतल्यानंतर अल्कोहोल आणि पाणी एकत्र करा. हे पाणी डाग पडलेल्या ठिकाणी टाकून हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे डाग हळूहळू साफ होईल.
डाग पडलेल्या कपड्यांवर लिंबाचा रस लावा आणि त्यावर मीठ टाका. यानंतर हे ३० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर धुवा. डाग लगेचच साफ होईल.
डाग असलेल्या भागावर पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट लावा. यानंतर ते हलक्या हाताने घासून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते डाग कोलगेटच्या ब्रशने घासा आणि नंतर धुवून टाका.
जर तुमच्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर रंगाचा डाग लागला असेल तर त्यासाठी सौम्य ब्लीच वापरा. ते पाण्यात मिसळा आणि कपडे धुवा. रंग सहज निघून जाईल.
व्हिनेगर आणि डिटर्जंटचे मिश्रण बनवून कपडे धुतल्याने डाग लवकर निघून जातात. कपड्यावर लागलेला रंग काढण्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे.