मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये 10 वर्षांपासून एक भिकारी भीक मागतोय. या भिकाऱ्याची गोष्ट ऐकूण संपूर्ण देश चकित झाला आहे. तो भिकारी कसा झाला याचं कुतुहूलही देशवासियांमध्ये निर्माण झालं आहे.
आठवडाभरापूर्वी मध्यप्रदेशतील विधानसभेच्या पोट-निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. दरम्यान या बुथच्या सुरक्षिततेची जबाबदारी रत्नेशसिंह तोमर आणि विजय भदौरिया या दोन डीएसपींवर होती. ड्युटीवर असताना रात्री 1:30 च्या दरम्यान त्यांनी एका भिकाऱ्याला थंडीत कुडकुडताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी या भिकाऱ्याजवळ जाऊन त्याच्याशी संवादही साधला.
त्याची परिस्थिती बघता रत्नेश तोमर यांनी त्याला बूट आणि जॅकेट दिलं. त्यानंतर हे अधिकारी परत जात असताना त्या भिकाऱ्याने रत्नेश सिंह तोमर आणि विजय भदौरिया या दोघांना त्यांच्या नावानं हाक मारली.
त्या दोघांनी चकीत होत त्या भिकाऱ्याला त्याचं नाव विचारलं. त्यानंतर हा भिकारी दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा बॅचमेट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मनिष मिश्रा असं या भिकाऱ्याचं नाव असून तो पोलीस दलात सब इन्सपेक्टर होता.
मनिष मिश्रा हे रत्नेश सिंह तोमर आणि विजय भदौरिया यांच्यासोबत 1999मध्ये सब इंस्पेक्टर म्हणून रुजू झाले होते. ते एक उत्तम निशानेबाज तर होतेच मात्र उत्तम इंव्हेस्टिगेटिव्ह ऑफीसर सुद्धा होते.
मधल्या काळात त्यांच्यावर मानसिक परिणाम झाल्याने त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. या दरम्यान मिश्रा यांच्या पत्नीने त्यांच्याशी घटस्फोटही घेतला. मनोरुग्ण झालेले मिश्राही एकदा घरातून अचानक बाहेर पडले आणि ते परतलेच नव्हते. त्यामुळे त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर दहा वर्षाने त्यांच्याच मित्रांना ते भिकाऱ्याच्या अवस्थेत सापडल्याने या मित्रांनाही धक्का बसला.
मनिष मिश्राची पूर्ण गोष्ट समजून घेतल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी मनिष यांना समाजसेवी संस्थेत पाठवलं. या संस्थेत त्यांच्यावर योग्य लक्ष ठेवण्यात येत आहे.