राज्यातून थंडी गायब झाली आहे, उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. मात्र आता आयएमडीकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसासोबत गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळासह जोरदार पावसाची शक्यता आहे, पावसासोबतच गारपिटीची देखील शक्यता आहे. पाऊस आणि गारपीट असं दुहेरी संकट राज्यावर असणार आहे.
आयएमडीच्या इशाऱ्यानुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात अवकाळीसह गारपिटीची शक्यता आहे. मुंबईत उष्ण व दमट हवामान वाढणार असून उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत मुंबईच्या हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे. मुंबईसह कोकणात दमट आणि उष्ण हवामान राहणार आहे.
कोकण आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून, गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यासह कोकणात पावसासोबतच तापमानात देखील वाढ होणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
विशेषतः 23 मार्चनंतर अवकाळी पावसाचा प्रभाव वाढेल. रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाचा अंदाज आहे.मराठवाड्यातही पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.