कबिरा मोबिलिटीने (Kabira Mobility) दोन नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक KM3000 आणि KM4000 लाँच केल्या आहेत. ग्राहकांना जबरदस्त अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने या दोन मेड इन इंडिया बाईक सादर करण्यात आल्या आहेत. तसेच या बाईक पर्यावरणास अनुकूल असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कबिरा मोबिलिटीने या दोन्ही बाईक्ससाठी आकर्षक किंमती ठेवल्या आहेत. KM3000, या बाईकची पीक पॉवर 6000W इतकी आहे. या बाईकची किंमत 1,26,990 रुपये (एक्स शोरुम गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे, तर KM4000 या बाईकची पीक पॉवर 8000W इतकी आहे. या बाईकची किंमत 1,36,990 रुपये (एक्स शोरुम गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे.
या मोटारसायकल्सची डिलीव्हरी मे-2021 पासून सुरु केली जाणार आहे. कबिरा मोबिलिटी या बाईक्ससाठी 20 फेब्रुवारीपासून बुकिंग घेण्यास सुरुवात करणार आहे. सुरुवातीला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई, गोवा आणि धारवाडसारख्या शहरांमध्ये या बाईकचा सेल सुरु केला जाईल. दोन्ही बाईक्स कबिरा मोबिलिटीच्या वेबसाईटवरुन बुक करता येतील.
KM3000 या बाईकचं टॉप स्पीड 100KMPH इतकं आहे तर या बाईकची रेंज 120KM पर्यंत आहे. KM4000 या बाईकचं टॉप स्पीड 120KMPH आणि रेंज 150KM इतकी आहे.
KM3000 या बाईकचं वजन 138 किलोग्रॅम इतकं आहे. या बाईकला 'स्पोर्ट्स बाइक' लुक देण्यात आला आहे. तर KM4000 या बाईकचं वजन 147 किलोग्रॅम इतकं असून ही बाईक 'नेक्ड बाइक' डिझाईनमध्ये सादर करण्यात आली आहे.