दिवाळी सण हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. दिव्यांना भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत महत्वाचे स्थान आहे.
आजपर्यंत पणती किंवा दिवे हे तेलाच्या वातीवर किंवा लाईटवरच्या माळा इथपर्यंत या दिव्यांची ख्याती पाहिली आहे. इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले सौरउर्जेवरचे दिवे हे या वर्षीच्या दिवाळीचे आकर्षण आहे.
दिवाळी सणाचे औचित्य साधून डीकेटीईच्या आयईईई ( IEEE) स्टुडेंट ब्रांच अंतर्गत इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी ‘दिवाळी 2020 सोलारवाली’ असा एक अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात सौरउर्जेवर चालणारे दिवे (पणत्या) तयार करण्यात आले आहेत.
या दिव्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे हे दिवे दिसायला हुबेहुब पारंपारिक दिव्यासारखे दिसतात. सौर उर्जेवर चालणारे दिवे हे दिवे तीन-चार तास सौर उर्जेमध्ये चार्जिंग केल्यास 8 ते 10 तास प्रज्वलीत होतात. या दिव्यांना तेल वात किंवा लाईट इत्यादी बाबी लागत नसल्यामुळे सर्व सामन्यांची आर्थिक बचत होणार आहे.
तसेच, या दिव्यांची गुणवत्ता उत्तम प्रकारची असून हे दिवे दिर्घकाळ टिकण्यास सक्षम आहेत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात 100 दिवे (पणत्या) तयार केले असून हे दिवे दिवाळी निमित्त डी.के.टी.ई.च्या आवारात लावण्यात येणार आहेत.