मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून अंतरवली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे.
मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारला आता शेवटची संधी आहे. सरकार आम्हाला जाणूनबुजून आरक्षण देत नाही, असा आरोप करत मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली.
"मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते", असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
"फूट पाडणे त्यांचं कामाचं आहे, मला राजकारणाकडे जायचं नाही, आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा, तिन्ही गॅझेट लागू करा, शिंदे समितीने 24 तास काम केले पाहिजे", अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
"आम्ही स्थगित केलेलं आमरण उपोषण आजपासून पुन्हा सुरु करत आहोत. मध्यरात्रीपासून आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहोत. आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक करु नये", असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय, नंतर आमच्या नावाने तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. आजपासून आमरण उपोषण सुरु करत आहे. तसेच या उपोषणाच्या माध्यमातून आणखी एक संधी सरकारला देत आहे. नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.