साधारणतः दिडशे वर्षांपूर्वी सामाजिक विषमता अंधश्रद्धा, कर्मकांड, स्त्री-पुरुष विषमता, विधवा विवाहास विरोध, सतीप्रथा यांसारख्या समाजघातक गोष्टींचं प्रस्थ माजलं होतं. असं असताना क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत, प्रसंगी घरच्यांचा आणि समाजाचा असा दुहेरी रोष पत्करून काम केलं.
सर्वच वर्गातील स्त्रिया आणि तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आणि मोठे आहेत.
इतकंच नाही तर बालसंगोपनगृह, बालिकाश्रम स्थापन करून आपलं दातृत्त्वही सिद्ध केलं. ज्योतीराव फुलेंनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब यांसारख्या ग्रंथामुळे तसेच सावित्रीबाईंनी लिहिलेल्या बावन्नकशी सुबोध रत्नाकर, काव्यफुले हा कवितासंग्रह यांसारख्या ग्रंथांमुळे त्यावेळी समाज परिवर्तनात मोलाची भर पडली होती.
अशा क्रांतिकारी दाम्पत्याचे त्याकाळातील विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. एकूणच त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची ओळख साऱ्या भारतीयांना व्हावी या हेतूने स्वयंदीप निर्मित “ज्योती सावित्री” हे 2 अंकी नाटक ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून नाट्यरसिकांच्या भेटीला आलंय.
‘Life Converter Group’ या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून नाट्यमालिकेच्या रूपात हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर साकारण्यात आलंय. यात क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेण्यात आलाय.
विशेष म्हणजे याला तब्बल 16 नामांकनंही मिळाली आहेत. ज्योती सावित्री या नाट्यमालिकेचे लेखक आणि निर्माते मंगेश पवार आणि कविता मोरवणकर हे आहेत.