भंडारा : जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आसलपाणी तलावावर सध्या विदेशी पक्ष्यांचा चिवचिवाट आहे. हे पक्षी मंगोलिया देशातून आले आहेत.
आसलपाणी तलावावर मंगोलिया देशातील पक्षी मुक्तविहार करीत असून हे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.
संग्रहित छायाचित्र.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र हे मुळात जैवविविधतेने नटलेले जंगल आहे. अशा या जैवविविधतेने नटलेल्या जंगलातील नयनरम्य तलावात मागील अनेक वर्षांपासून स्थलांतरित पक्षी येतात. आसलपाणी तलावाचे शुद्धा पाणी या तलावाची विशेषता आहे.
हा तलाव गवत, खुरटी झुडपे, कमळ, पणाळीली व अन्य वनस्पतीने वेढलेला आहे. त्यामुळे येथे मंगोलिया या देशातून पक्षी आले आहेत. यामध्ये लिटिल ग्रेप्स, कॉटन पिग्मी डक्स, विसलिंग डक्स, ग्रे हेरोन, पर्पल हेरोन, पर्पल स्वॅप हेन, कॉमन कूट, वॉटर कॉफ हे स्थलांतरित अशा अनेक पक्षांचा समावेश आहे.
दरवर्षी थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात या स्थलांतरित पक्ष्यांचे येथे आगमन होते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये येथे मुक्तविहार केल्यानंतर हे स्थलांतरित पक्षी मार्च महिन्यामध्ये निघून जातात.
मात्र, यावर्षी पावसाळा सुरु होत आला तरी या नयनरम्य परिसरात असलेल्या आसलपाणी तलावातील त्यांचा मुक्काम अद्याप संपलेला नाही. या तलावातील आणि जंगलातील जैवविविधता या पक्ष्यांसाठी आकर्षण ठरत असून हा परिसर आवडल्याने जणू त्यांनी येथेच मुक्काम ठोकलाय, अशी प्रचिती येत आहे.