Marathi News Photo gallery Nanded Marathi Sahitya Sammelan: The first Marathi Sahitya Sanskar Sammelan organized by Marathi Sahitya Sanskar Mandal in Nanded
साहित्यात तेवला सत्कार्याचा दीप; नांदेडमध्ये मराठी साहित्य संस्कार मंडळाचे संमेलन उत्साहात!
नांदेड जिल्ह्यातल्या वाकोडी येथेपहिले मराठी साहित्य संस्कार संमेलन आयोजित करण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आर्थिक मदत करून या संमेलनाचे उदघाटन झाले.
1 / 6
नांदेड जिल्ह्यातल्या वाकोडी (ता. कळमनुरी) येथे मराठी साहित्य संस्कार मंडळातर्फे पहिले मराठी साहित्य संस्कार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना इसाप प्रकाशनचे दत्ता डांगे आणि संजीवनी डांगे यांच्या हस्ते आर्थिक मदत करून संमेलनाचे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने उदघाटन करण्यात आले.
2 / 6
वाकोडीत संमलेनस्थळापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीमध्ये ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी विठ्ठल भक्तीची भजने म्हटली. मुलींनी लेझीमच्या ठेक्यावर ताल धरला. तर कोणी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून सहभागी झाले.
3 / 6
नांदेड जिल्ह्यातल्या पहिल्या मराठी साहित्य संस्कार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले हे होते, तर उद्घाटक म्हणून कादंबरीकार बाबाराव मुसळे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख केशव सखाराम देशमुख, कवी देविदास फुलारी हे मान्यवर उपस्थित होते.
4 / 6
वाकोडीतील मराठी साहित्य संस्कार संमेलनात इसाप प्रकाशनचे दत्ता डांगे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक विजय वाकडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, अनिल शेवाळकर, दिलीप नरहरे, बबन शिंदे, यशवंतराव चव्हाण विचार मंचचे नारायण शिंदे, प्रा. डॉ. माधव जाधव, दिलीप दारव्हेकर, ग्रामीण साहित्यिक शफी बोलडेकर, द. आ. गुडूप यांचा सत्कार करण्यात आला.
5 / 6
संमेलनात विजय गं. वाकडे यांची पंडित पाटील व मनोजकुमार थोरात यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर प्रसिद्ध कथाकार प्रा. सु. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले. यात अध्यक्षांसह स्वाती कान्हेगावकर व सुप्रिया दापके यांनी सुंदर कथाकथन करून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर प्रा. डॉ. संगिता वचार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगले.
6 / 6
साहित्य संस्कार मंडळाचे संस्थापक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केले. नवोदितांच्या पाठीशी आपण सदैव असून, यातूनच सत्कार्याचा दीप तेवता ठेवण्याचे काम आपण करू. साहित्य संस्कार मंडळाची स्थापना करण्यामागे हीच प्रमुख भूमिका असल्याचे ते म्हणाले. यावेळी यावेळी कवयित्री वसुंधरा सुत्रावे यांच्या 'करुणासिंधु' या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही झाले. संमेलनाला पंचक्रोशीतील रसिकांनी गर्दी केली होती.