गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरविण्याचे काम अंतिम टप्प्यांवर आले आहे. वेगवेगळ्या गणेश चित्र शाळेत रंगकामाचा शेवटचा हात सुरु आहे. कारागिरांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
चित्रशाळेत यंदा जवळपास 30 हजारांहून अधिक लहान तसेच मोठय़ा मूर्ती आकारास येत आहेत.गेल्यावर्षा पेक्षा यावर्षी गणेश मूर्तींची संख्या जास्त असून बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित आहे.
मूर्ती घडविण्यासाठी शेकडो हात रात्रदिवस राबत आहेत. येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.त्यामुळे येथील मूर्ती कारखान्यांमध्ये कामाला वेग आला आहे.प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या साच्यातून मूर्ती घडविल्या जात आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मुर्त्यांना राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी असून गुजरात, तेलंगणा, आंध्रमध्य प्रदेश यासह राजस्थान राज्यात सर्वात जास्त मागणी आहे. नंदुरबार जिल्हा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने या भागातून गणेश मुर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
यावर्षी गणेश मूर्तीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असून यंदा सोशल मीडियावर पाहून मूर्ती बुक केली जात आहेत. महिन्याभरापूर्वीपासूनच गणेश मूर्तींचे बुकिंग सुरु झाले असल्याचे मूर्तीकार नारायण वाघ यांनी म्हटले आहे.
सोशल मिडीयामुळे यंदा लालबाग येथूनही मूर्तींना ऑर्डर आल्या होत्या.मात्र बुकींग फुल्ल झाल्याने यंदा बऱ्याच ठिकाणी मुर्त्या देता आल्या नसल्याचे मूर्तीकार नारायण वाघ यांनी म्हटले आहे.
6 इंच पासून तर 22 फुटापर्यंतच्या भव्य गणेश मुर्त्या कारखान्यांमध्ये तयार होत आहेत. यंदा मुर्त्यांच्या किमतीत पंचवीस ते तीस टक्के वाढ झाली असून, पाच हजारापासून दीड लाखापर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.