आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा मध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात संपन्न झाली.
आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरु केल्याच म्हटलं जात, हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि सामानातेतील वैविध्याचे रंग आणि पारंपारिक स्वरूप कायम ठेवून आहे.
ढोल,बासरी, शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधव पाहटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेले.
आज पहाटे सहाच्या सुमारास पेटलेल्या या होलीकोत्सवात नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी. जी शेखर पाटील परिवारासमवेत होळीचा आनंद लुटतांना दिसून आले.
पारंपारिक आदिवासी वाद्याच्या ठेक्यावर ताल धरत ते आदिवासी नृत्यात तल्लीन झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आणि जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर पाटील यांनी देखील आदिवासी नृत्यावर ठेका धरला होता.