पंढरपुरात सततच्या पावसामुळे द्राक्षावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या बागा फेल गेल्या. लाखो रुपयांचा खर्च करुनही हाती काहीच मिळणार नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवणे सुरु केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील शेतकरी महादेव लवटे यांनी दहा लाख रुपये खर्च करुन फळावर आणलेल्या चार एकर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. शेवटी त्यांनी स्वतःच्या हाताने कुऱ्हाडीने बाग तोडून टाकली आहे.
मागील पंधरादिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये द्राक्ष, डाळिंब या फळ बागांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात सुमारे 15 हजार एकरावर द्राक्षाचे पिक घेतले जाते. त्यापैकी सुमारे सात ते आठ हजार एकरावरील बागा उध्दवस्थ झाल्या आहेत.
पावसामुळे हातातोंडासी आलेल्या बागा डोळ्यादेखत नष्ट झाल्या आहेत. अतिवृष्टीनंतर मर, डावण्या, करपा या सारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढला आहे. दुहेरी संकटामुळे येथील द्राक्ष शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.
महादेव लवटे यांनी अत्यंत कष्टाने जोपासलेल्या चार एकर बागेसाठी औषधे, खते, मजुरीसाठी बॅंकेचे कर्ज काढून दहा लाख रुपयांचा खर्च करुन बाग फळासाठी तयार केली होती. लहान-लहान घडांनी बाग लगवड केली होती. अशातच अतिवृष्टी झाली आणि लवटे यांच्या बागेचे होत्याचे नव्हते झाले.
यामध्ये त्यांचे सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकसान झाल्यानंतर त्यांना अद्याप विमा कंपनीची मदत मिळाली नाही की शासनाने मदतीसाठी हात पुढे केला नाही. विमा कंपनीने नुकसानभऱपाई द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
महादेव लवटे यांच्या सारख्या अनेक शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट ओढवले आहे. पावसामुळे पंढरपुरातील अनेक शेतकऱ्यांवर द्राक्ष बागा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
शासनाने भरीव मदत केली तरच येथील द्राक्ष शेतकरी तग धरेल अन्यथा द्राक्ष शेती नष्ट होण्याची भिती आहे.