विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आदी नेते आज राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले. त्यावेळी अजित पवार यांनी राज्यपालांना एक पत्रही दिलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारासह राज्यातील काही प्रश्नांकडे राज्यपालांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय.
राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले की, आम्ही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी आम्हाला सव्वाचारची वेळ दिली होती. राज्यपालांनी आमचं सगळं ऐकून घेतलं. विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील काही भागात झालेली अतिवृष्टी आणि अडचणीत आलेला शेतकरी याकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय टीमला बोलावण्याबाबत अद्याप चर्चा नाही, कुणाचं वक्तव्य नाही. त्यामुळे केंद्राकडून काही मदत मिळण्याची अपेक्षा ठेवावी की नाही अशी स्थिती आहे. या सर्व गोष्टी आम्ही राज्यपालांच्या लक्षात आणून दिल्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची आमची मागणी आहे, असंही अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितलं.