एक वर्षापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. सुरुवातीच्या काळात टेस्टिंग अडचणीची ठरत होती. कारण तेव्हा टेस्टिंगची यंत्रणा आणि किटचं प्रमाण कमी होतं. मात्र आता कोरोना टेस्टिंगचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी RT-PCR टेस्ट सर्वात विश्वसनीय मानली जातेय. अशावेळी RT-PCRचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
RT-PCR चा फुल फॉर्म रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमर्स चेन रिएक्शन (Reverse Transcription Polymerase Chain Reaction) असा आहे. या चाचणीद्वारे संशयीत व्यक्तीच्या शरिरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे की नाही? याची माहिती मिळते. साधारणपणे या टेस्टमध्ये विषाणूच्या RNA ची तपासणी केली जाते. या चाचणीसाठी नाक किंवा घशातील स्वॅब घेतला जातो.
RT-PCR टेस्ट रिपोर्ट - या चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी साधारणपणे 4 ते 8 तास लागू शकतात. मात्र, चाचण्याचं प्रमाण अधिक असेल तर 1 ते 5 दिवसही लागू शकतात. ट्रूनेट टेस्ट (TrueNat Test) किंवा एंटिजेन टेस्ट (AntiGen Test)पेक्षा RT-PCR चाचणीचा रिपोर्ट विश्वसनीय मानला जातो.
RT-PCR टेस्ट आपल्या शरिरातील विषाणूचा संसर्ग शोधण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे लक्षणं नसलेल्या व्यक्तींची चाचणीही पॉझिटिव्ह येऊ शकते. दरम्यान या टेस्टचीही एक सीमा आहे. म्हणजे पुढे चालून काही लक्षणं दिसू शकतात का? तसंच विषाणूचा संसर्ग किती गंभीर स्वरुप घेऊ शकतो? हे RT-PCR टेस्टद्वारे समजू शकत नाही.
या चाचणीची किंमत सुरुवातीला 2400 रुपयांपर्यंत होती. पुढे केंद्र आणि राज्य सरकारांनी हस्तक्षेप करत टेस्टची किंमत कमी केली. आता विविध राज्यात खासगी रुग्णालयांमध्ये 400 ते 800 रुपयांमध्ये RT-PCR चाचणी केली जाते. तर सरकारी रुग्णालयांमध्ये ही चाचणी मोफत केली जाते.