राष्ट्रवादीच्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज त्यांच्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात आल्या होत्या.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरोज अहिरे तसंच त्यांच् बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी सरोज यांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुकही केलं.
विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणं आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. पण तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहात. त्याबद्दल तुमचं कौतुक, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
आमदार संजय बनसोडे आणि आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हेदेखील यावेळी उपस्थित होत्या.
सरोज अहिरे या आज त्यांच्या बाळाला घेऊन विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं.