राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत 24.74% मतदान झालं आहे. अशातच महिला मतदार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसत आहे.
आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर महिला मतदार मोठ्या संख्येने दिसत आहेत. रांगेत उभं राहत त्या आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. घराबाहेर पडत आपला हक्क बजावत आहेत. याच महिलांचं मत राजस्थानचं भवितव्य ठरणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
यंदा राजस्थानमध्ये 5 कोटी 26 लाख 80 हजार 545 मतदार आहेत. यात 2 कोटी 51 लाख 79 हजार 422 महिला मतदार आहेत. त्यामुळे महिलांची मत यंदा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाकडे देशाचं लक्ष असेल.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही मतदान केलं. तसंच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही मतदान केलं. घराबाहेर पडत मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं.
आज मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल. यंदा काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळाली. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल. पण या निकालात महिलांचं 'मत' निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.