Ram Navmi 2021 : आज रामनवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस...राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी दिवशी राम नवमी म्हणून हा सण साजरा केला जातो.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरातील देवाचा गाभारा, सोळखांबी, चार खांबी तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा विविध फुलांनी सजवण्यात आला आहे.
या ठिकाणी पिवळा झेंडू, गुलछडी, जरबेरा, शेवंती, अननस अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी आणि फळांनी आकर्षक सजावट केली आहे.
तसेच रामनवमी निमित्त श्री. विठ्ठलाला पिस्ता रंगाचे सोवळे तर रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाची पैठणी साडी परिधान करण्यात आली आहे.
त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
तर दुसरीकडे रामनवमीचे औचित्य साधत आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
या मंदिरात विविध फुलांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिरातील गाभारा आणि समाधी स्थळ आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.
तसेच नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात भाविकांशिवाय रामजन्म सोहळा साजरा केला जात आहे. दरवर्षी हजारो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिराच्या स्थापनेपासून सलग दुसऱ्यांदा मंदिर रामनवमीला बंद असणार आहे.
दरम्यान भाविक नसले तरी मंदिरातील निवडक पुजाऱ्यांच्या वतीने पहाटेपासूनच महाअभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.
या मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना देखील साजशृंगार करण्यात आला आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी हजारो नाशिककरांना घरी बसूनच ऑनलाईन हा जन्म सोहळा पाहता येणार आहे.