मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणास्त्र उपसलं आहे. आज सकाळपासून संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केलीय.
संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून उपोषणाला बसले आहेत. तसंच अनेक संस्था आणि संघटनांनीही उपोषणाला पाठिंबा दिलाय.
मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी व मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी, याकरिता मी उपोषणास बसत आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजे यांनी केलाय.
रात्रीच्या सुमारास संभाजीराजे यांनी उपोषणस्थळीच मुक्काम ठोकला. त्यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी आझाद मैदानावरच बिछाना टाकला.
महत्वाची बाब म्हणजे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज उपोषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते, नेते, संघटनेचे पदाधिकारी आझाद मैदानावर पोहोचले. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून किंवा सरकारमधून कुणीही आज संभाजीराजेंच्या भेटीसाठी पोहोचलं नाही.