राज्यात सध्या हनुमान चालिसा पठणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता हनुमान चालीसावरुन राजकारणाने जोर धरला आहे. अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिलाय.
रवी राणा यांनी गुरुवारी जाहीर केल्यानुसार राणा दाम्पत्य आज मुंबईत आल्याची माहिती मिळतेय. या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.
रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येतेय. त्याचबरोबर राणा दाम्पत्याला मातोश्रीसमोर येऊन दाखवण्याचं आव्हानही शिवसैनिकांकडून दिलं जात आहे.
मातोश्रीबाहेर केवळ शिवसैनिकच नाही तर खासदार विनायक राऊत, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनीही मातोश्रीबाहेर बसून राणा दाम्पत्याची वाट पाहत असल्याचं म्हटलंय. महाप्रसाद तयार आहे, त्यांनी यावं आम्ही त्यांना प्रसाद द्यायला तयार आहोत, असा टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याला दिलाय.
हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने राज्याला लागलेली साडेसाती घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं पाहिजे. त्यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं नाही तर आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करु, असं आव्हान त्यांनी दिलं होतं.