उजनीचे खास आकर्षण असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित हे विदेशी पक्षी शेकडोंच्या संख्येने करमाळा तालुक्यातील डिकसळ रेल्वे पूल, कोंढारचिंचोली, कात्रज, टाकळी, कुंभारगाव, केत्तूर, वाशिंबे, कुगाव आदी गावांच्या शिवारातील नदीपात्रात जलाशयाच्या काठावर आपला डेरा टाकून आहेत.
500 हून अधिक संख्येने फ्लेमिंगो पक्षी धरण परिसरातील पाणलोट क्षेत्रात येऊन दाखल झाले आहेत. या वर्षी बहुसंख्येने हे नजाकतदार पक्षी आपल्या पिल्लावळींसह आल्यामुळे धरण परिसरात पक्षी निरीक्षक व उजनी जलाशयावर भ्रमंती करणाऱ्या पर्यटकंमध्ये उत्साह संचारला आहे.
दर आठवड्याच्या अखेरीस पक्षी निरीक्षण करण्यासाठी मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील अनेक पक्षी निरीक्षक यशवंत जलाशय परिसरात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. नियोजित आगमनाचे वेळापत्रकात बदल करून महिना अगोदरच पक्षी दाखल झाले आहेत.
या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात धरणाच्या लाभक्षेत्रात विपुल प्रमाणात पाऊस पडल्याने पावसाळ्याच्या प्रारंभीच धरण काठोकाठ भरले होते; स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याखाली गेल्यामुळे हे पक्ष्यांनी आपल्या प्रवासाचे वेळापत्रक बदलून आगमन लांबणीवर टाकतील असे वाटत असताना नियोजित वेळापत्रकात बदल करून यंदा लवकर सुमारे 50 फ्लेमिंगो नोव्हेंबर महिन्यातच येऊन दाखल झाले होते.
मराठीतील अग्निपंख व रोहित पक्षी या नावाने ओळखले जाणारे हे दिमाखदार विदेशी पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत व पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात.
या ठिकाणी नवीन पीढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह छोट्या मोठ्या समूह करून भारतातील विविध जलस्थानाकडे प्रस्थान करतात. आपल्या अनुकूलानुसार पुढे पावसाळा सुरू होई पर्यंत विविध विशाल जलस्थानावर विखरून राहतात.