Ranji Trophy : रणजी ट्रॉफी बंद करा! बंगालच्या कर्णधाराने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत वाचला पाढा
रणजी ट्रॉफीचं महत्त्व कमी होत असल्याने बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देशांतर्गत रणजी स्पर्धा थांबवण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. केरळविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यादरम्यान मनोज तिवारी यांचे हे वक्तव्य आले आहे. वास्तविक, केरळ आणि बंगालमधील सामना स्टेडियममध्ये नाही तर कॉलेजच्या मैदानात खेळवला जात आहे.
1 / 6
भारत इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. तर दुसरीकडे, देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. रणजी करंडक ही भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेतील चांगल्या खेळीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. पण आता या स्पर्धेच्या आयोजनावर संताप व्यक्त होत आहे.
2 / 6
बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीमध्ये एक मोठी गोष्ट उघड केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, पुढील हंगामापासून रणजी ट्रॉफी बंद करून टाकावी. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
3 / 6
"रणजी टूर्नामेंटमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या होत आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेचे महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे पूर्णपणे निराश झालो आहे.", असंही पुढे लिहिलं आहे. तसेच रागवलेला एक इमोजीही पोस्ट केला आहे.
4 / 6
मनोज तिवारीने फेसबुक लाईव्हवर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, आम्ही केरळसोबत एकाच मैदानावर खेळत आहोत. आम्ही स्टेडियममध्ये सामने खेळत नाही. इथे चांगले स्टेडियम बांधले आहे, पण आम्ही तिथे सामने खेळत नाही. आम्हाला शहराबाहेर मैदान देण्यात आले आहे.
5 / 6
ड्रेसिंग रूममध्ये तुम्ही कोणतीही योजना करू शकत नाही. विरोधी संघासह आमची खोली एकमेकांच्या इतकी जवळ आहे की इतर काय म्हणतात ते तुम्ही ऐकू शकता. मला आशा आहे की भविष्यात हे विचारात घेतले जाईल. यावर मी आवाज उठवत आहे, असंही मनोज तिवारी म्हणाला.
6 / 6
सध्याच्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली बंगालचा संघ आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. यापैकी एक सामना संघाने जिंकला आहे तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. मनोज तिवारीने भारतासाठी 12 वनडे सामन्यात 287 धावा केल्या आहेत. तसेच तीन टी20 सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मनोज तिवारी बंगाल संघाचे कर्णधार आहे. त्याने 146 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 10124 धावा केल्या आहेत.