भारतात 12 वर्षानंतर पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम सामना असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 8 ऑक्टोबरला पहिला सामना होणार आहे.
2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं होतं. 28 वर्षानंतर वनडे वर्ल्डकप जिंकला होता. धोनीने 49व्या षटकात मारलेल्या षटकारामुळे भारत इतिहासात दुसऱ्यांदा विश्वचषक चॅम्पियन बनला.
अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनी याने नाबाद 93 धावांची खेळी केली होती. शेवटी नुवान कुलसेवकरा याच्या चेंडूवर षटकार ठोकत सामना जिंकवला होता. हा षटकार आजही स्मरणात आहे.
टीम इंडियाला 28 वर्षानंतर जेतेपद मिळवून देणारा षटकाराचा चेंडू ज्या सीटवर पडला होता, आता त्याचा लिलाव होणार आहे. जर तुम्ही महेंद्रसिंह धोनी याचे चाहते असाल तर ही तुमच्यासाठी संधी आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितलं आहे की, "धोनीने मारलेला षटकारानंतर चेंडू ज्या दोन खुर्च्यांवर पडला त्या खुर्च्यांचा लिलाव केला जाणार आहे."
लिलावातून मिळणाऱ्या पैशातून उभरत्या खेळाडूंना स्कॉलरशिपच्या रुपाने मदत केली जाईल. एमसीएने याच वर्षी आयपीएलमध्ये षटकार मारलेली जागा एक मेमोरियल करण्याची घोषणा केली होती. या इव्हेंटमध्ये महेंद्रसिंह धोनीचा सन्मान करण्यात आला होता.