आयपीएल 16 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स चॅम्पियन ठरली. मात्र ऑरेन्ज आणि पर्पल कॅप्स उपविजेत्या गुजरात टायटन्स टीमने पटकावल्या. ऑरेन्ज कॅप शुबमन गिल याने पटकावली. तर मोहम्मद शमी 17 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेत पर्पल कॅप पुरस्काराचा मानकरी ठरला. मात्र शमीला आपल्याच सहकाऱ्यांचं आव्हान होतं.
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्याच्या यादीत गुजरात टायटन्स टीमचा मोहित शर्मा दुसऱ्या स्थानी राहिला. मोहितने 14 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या. मोहितने या दरम्यान एकदा 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला.
गुजरात टायटन्स टीमचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने आपल्या फिरकीच्या करामतीवर 17 मॅचमध्ये एकूण 27 फलंदाजांचा काटा काढला. राशिद पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी राहिला.
कमालीची बाब म्हणजे मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा-राशिद खान यांच्यामध्ये फक्त 1 विकेट्चं अंतर होतं. फक्त 1 विकेटच्या अंतराने शमी पर्पल कॅप जिंकला. तर मोहित आणि राशिद या दोघांनी प्रत्येकी 27-27 विकेट्स घेतल्या. मात्र मोहितचा इकॉनॉमी रेट राशिदपेक्षा चांगला असल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. थोडक्यात काय,तर मोहितने शमी आणि राशिदच्या तुलनेत 3 मॅत कमी खेळूनही आसपास तेवढ्याच विकेट्स घेतल्या आहेत. मोहितने आणखी 2 विकेट्स घेतल्या असत्या तर तो पर्पल कॅप विनर ठरला असता. म्हणजेच मोहितला 10 लाख रुपयेही मिळाले असते. शमी आणि मोहित यांच्यातील 2 विकेट्सचा फरक होता.
वय हा फक्त एक आकडा असतो, काहीही करण्याची जिद्द असली तर आपण करु शकतो, हे टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनिंग संघाचा सदस्य राहिलेल्या पीयूष चावला याने सिद्ध करुन दाखवलं. पीयूष या 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. पीयूषने 16 सामन्यांमध्ये 22 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पीयूष 22 विकेट्स घेत चौथ्या स्थानी राहिला.
तर राजस्थान रॉयल्स टीमचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने 14 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या. चहलने पाचवं स्थान पटकावलं.