आयपीएल 2025 स्पर्धेत सर्व संघांनी त्यांचे पहिले सामने खेळले आहेत आणि आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत अनेक खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या रकमेला साजेशी कामगिरी केली, तर काहींनी खराब कामगिरी केली. आयपीएल लिलावात सर्वाधिक रक्कम मिळवणाऱ्या टॉप 10 खेळाडूंनी कशी कामगिरी केली, ते जाणून घ्या
ऋषभ पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनऊ सुपरजायंट्सने त्याला 27 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतलं आणि कर्णधारपदाची धुरा दिली. पण पंतला त्याच्या पहिल्या सामन्यात खाते उघडता आले नाही. इतकंच काय तर संघाला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने या किंमतीला न्याय दिला असंच म्हणावं लागेल. अय्यरने पंजाब किंग्जसाठी नाबाद 97 धावांची नाबाद खेळी केली. तसेच आपल्या नेतृत्वाखाली संघाला विजय मिळवून दिला.
आयपीएल 2025 मध्ये केकेआर संघातील अष्टपैलू वेंकटेश अय्यर हा सर्वात महागडा खेळाडू आहे. पण मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच सामन्यात वेंकटेश अय्यरचा डाव फक्त 6 धावांवर संपला. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात व्यंकटेशने फलंदाजी केली नाही. यासोबतच केकेआर संघालाही विजय मिळवता आला नाही.
पंजाब किंग्जने खरेदी केलेल्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. पंजाब किंग्जने या दोन्ही गोलंदाजांसाठी प्रत्येकी 18 कोटी रुपये दिले. पहिल्या सामन्यात अर्शदीपने 4 षटकांत 36 धावा देत 2 विकेट घेतल्या. दुसरीकडे, चहलने 3 षटकांत 34 धावा दिल्या पण एकही विकेट घेतली नाही.
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला गुजरात टायटन्सने 15.75 कोटी रुपयांना खरेदी केले. पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बटलरने 33 चेंडूत 54 धावा केल्या. पण त्याच्या अर्धशतकानंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
लिलावात दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलेला केएल राहुल हा सर्वात महागडा खेळाडू आहे, दिल्लीने या विकेटकीपर-फलंदाजासाठी तब्बल 14 कोटी रुपये मोजले आहेत. पण कौटुंबिक कारणांमुळे राहुल पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.
जोफ्रा आर्चर, ट्रेंट बोल्ट आणि जोश हेझलवूड यांना 12.50 कोटी रुपये मिळाले. पण आर्चरला त्याच्या पहिल्याच सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज होण्याचा मान मिळाला आहे. दुसरीकडे, ट्रेंट बोल्टनेही 3 षटकांत 27 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. तर हेझलवूडने 4 षटकांत 22 धावा देत 2 विकेट घेतल्या. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)